यावल,(दिपक नेवे)- शेती व शेतीपूरक व्यवसायात विविध असे नाविन्यपूर्ण प्रयोग करून उत्कृष्ट शेतीकार्य करणाऱ्या शेतकरी बांधवांना जळगाव जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून जि.प.सेस योजनेअंतर्गत दरवर्षी आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असतो. त्यानुसार सन २०२०-२१ यावर्षीचा ‘ आदर्श शेतकरी ‘ पुरस्कार साकळी ता.यावल येथील प्रगतिशील शेतकरी अनिल रघुनाथ जोशी यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे.सदर कार्यक्रम दरवर्षी जळगाव येथे आयोजित केला जातो. मात्र यावर्षीचे कोरोना महामारी चे संकट पाहता दि.८ रोजी यावल पंचायत समितीस्तरावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
या प्रसंगी सदर पुरस्कार सभापती सौ.पल्लवीताई चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, पंचायत समितीचे गटनेता दीपक अण्णा पाटील,पं.स. गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील, डांभुर्णीचे उपसरपंच पुरूजीत चौधरी यांच्या उपस्थित देण्यात आला आणि श्री जोशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल- श्रीफळ असे आहे. श्री.अनिल जोशी यांना हा मानाचा व त्यांचा शेती क्षेत्रातील कर्तत्वाचा गौरव करणारा पुरस्कार मिळाल्याने सदर बाब तालुक्यासह गावासाठी फार मोठी गौरवाची व अभिमानाची ठरली आहे.
श्री.जोशी हे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना नुसार माती परीक्षणानुसार खते वापर, बीजप्रक्रिया, अंतर पिक पद्धत, सेंद्रिय शेती,निंबोण जिवअमृत वापर, बांधावर फळबाग लागवड करीत विविध माध्यमातून नाविन्यपुर्णतेने तसेच कमी खर्चात शेती करीत आहे.त्यांनी कृषि प्रदर्शन व धान्य महोत्सव,कृषि दिडी या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला आहे.ते साकळी येथील श्री सच्चिदस्वरूप बहुद्देशीय संस्था संचालित श्रीगजानन महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष असून साकळी-शेगाव पायी दिंडी आयोजन दरम्यान सर्व वारकरी-भक्तांच्या सहकार्यातून दिंडीमार्गात विविध झाडांच्या तसेच वनऔषधी झाडांच्या बिया टाकून व्यापक असा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री जोशी यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.