सांगली, (प्रतिनिधी) – कोरोना हा रोग नसून मानसिक आजार असल्याचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी म्हटलं असून पुन्हा एकदा ‘वादग्रस्त’ वक्तव्य केले आहे. यापूर्वी देखील अनेकदा बेताल वक्तव्य करून वातावरण तापवलं आहे.या ना त्या विषयावरून वादग्रस्त वक्तव्य करणं संभाजी भिडेंसाठी नवीन नाही.
गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात सातत्याने कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यातच काही ठिकाणी वाढत्या कोरोनाबाधितांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. कोरोनासमोर सरकारी यंत्रणा हतबल ठरत असतांना वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यूदराची भीती वाढत आहे. असे असतानाच कोरानाची साथ आणि कोरोना मृत्यू बाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
कोरोनाबाबत हे वक्तव्य संभाजी भिडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. ते म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे. पण मुळात कोरोना हा रोगच नाही. कोरोना हा मानसिक आजार असून कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यकीत या जगण्याच्या लायकीच्या नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.