मुंबई, – तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठ पानाचे पत्र देऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून हे पत्र ‘लेटर बॉम्ब’ ठरल्याने आज राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला आहे की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. ही वसुली मुंबईतील बार, रेस्टॉरंट, हॉटेल कडून करण्याची जबाबदारी सचिन वाझेंवर असल्याचा गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला असून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन सर्व आरोप फेटाळले असून त्यांनी म्हटलं आहे की, मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फ़ोटकं प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे असं म्हटलं आहे.