नवी दिल्ली : देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्यात कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे.
सुषमा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत होतं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात यश आलं नाही. तिथे सुषमा यांनी प्राणज्योत मालवली. सुषमा यांच्यासोबत त्यांचे पती व कुटुंबातील अन्य सदस्य होते. सुषमा बऱ्याच काळापासून आजारी होत्या. त्यांचं किडनी ट्रान्सप्लांटही झालं होतं.
सुषमा स्वराज सोशल मीडियावर फार सक्रिय होत्या. जम्मू-काश्मीरला कलम ३७० च्या जोखाडातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच जम्मू-काश्मीरचं विभाजन करणारं विधेयक संसेदत मंजूर करून घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल सुषमा यांनी आज सायंकाळी साडेसात वाजता ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. ‘मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी’ अशा भावनाही सुषमा यांनी या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. या ट्विटनंतर काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली.
सुषमा स्वराज सर्वप्रथम १९९० मध्ये राज्यसभेवर निवडून आल्या. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या. सुषमा यांनी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण व नंतर आरोग्य मंत्रालयाची धुरा वाहिली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळली. सुषमा यांनी आपल्या ओजस्वी वाणीने जागतिक व्यासपीठांवर दबदबा निर्माण केला. संयुक्त राष्ट्रसंघातील सडेतोड भाषणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियातून येणाऱ्या विविध तक्रारींचा त्यांनी तिथल्या तिथे निपटारा करून वाहवा मिळवली. सोळाव्या लोकसभेत सुषमा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीतून त्यांनी स्वत:हून माघार घेतली. प्रकृतीच्या कारणास्तव आपण निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. दिल्लीच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.
भारतीय राजकारणातील झंझावाती व्यक्तिमत्त्व हरपले -मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक झंझावाती आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे
मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात श्रीमती स्वराज भारतीय राजकारणातील एक खंबीर नेतृत्व होते. गेल्या पन्नास वर्षांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी संसदीय राजकारणात स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध विभागांचा कार्यभार त्यांनी जबाबदारीने सांभाळला होता विशेषत: एका महत्त्वाच्या कालखंडात त्यांनी पाच वर्षे परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली होती. यासोबत अटलजींच्या मंत्रिमंडळातही त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण, सूचना आणि प्रसारण मंत्रालय अशा विभागांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळताना आपल्यातल्या निष्णात संसदपटूची प्रचीती आणून दिली होती. अत्यंत तरुण वयात राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या सुषमाजींनी हरियाणाच्या मंत्रिपदासह दिल्लीचे मुख्यमंत्रीपदही भूषवले होते. एक श्रेष्ठ विधिज्ञ , साहित्यप्रेमी, प्रभावी वक्त्या, अभिजात रसिक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही विशेष पैलू होते. त्यांच्या निधनाने आपण ज्येष्ठ नेत्या आणि मार्गदर्शक गमावल्या आहेतच पण त्यासोबत माझीही वैयक्तिक हानी झाली आहे.
सुषमा स्वराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती… (जन्म: १४ फेब्रु१९५२- मृत्यु: ६ आगस्ट २०१९)
त्या एक भारतीय राजकारणी,सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील होत्या. त्या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या असून २६ मे २०१४ पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत होत्या; इंदिरा गांधीनंतर पदावर पद घेणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. त्या संसदेचे सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या होत्या . १९७७ मध्ये २५ वर्षांच्या वयात त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणाऱ्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. त्यांनी १३ ऑक्टोबर १९९८ पासून ३ डिसेंबर १९९८ पर्यंत दिल्लीच्या ५ व्या मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ सालातील निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या इ.स. २००० – २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली. त्या डिसेंबर इ.स. २००९ ते मे २०१४ दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या.