सुमारे ३ दशकापूर्वी एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव म्हणून पत्रकारितेत येतो , पुढे अत्यंत विपरीत परिस्थिती असतानाही परिस्थितीचा बाऊ न करता, किंवा रडगाणे न गाता , जिल्ह्याच्या पत्रकारितेत स्वतःचे निर्माण करतो आणि त्यानंतर पत्रकारितेच्या माध्यमातून काहीतरी रचनात्मक निर्मितीसाठी धडपडतो , पत्रकारांचे संघटन बांधतो आणि राज्य पातळीवर स्वतःचा ठसा उमटवितो हा सारा प्रवास बोलायला सोपा असला तरी प्रत्यक्ष जगायला तितकाच आव्हानात्मक आहे .
पण हे जगणं, पत्रकारिता, संघटन खऱ्याअर्थाने एन्जॉय करत पत्रकारिता क्षेत्राला एक वेगळा आयाम देणारे नेतृत्व म्हणून वसंत मुंडेंकडे पाहावे लागते.
बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेत वसंत मुंडे या नावाभोवती एक वलय आहे. राजकारण, समाजकारणातील किमान २ पिढ्या या नावाला आत्मीयतेने ओळखतात. कोठे सहकारी, कोठे सल्लागार अशा भूमिका बजावत पत्रकारितेच्या माध्यमातून काहीतरी उभे करण्यासाठी धडपडणारा व्यक्ती म्हणून यांची ओळख आहे.
पत्रकारितेच्या प्रवासात लोकपत्र पासून लोकसत्ता पर्यंतचा प्रवास म्हणजे एका ग्रामीण भागातील तरुणासाठी मोठे आव्हानच, पण वसंत मुंडे यांनी लीलया पेलले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांना समोर आणत, वेगवेगळ्या व्यक्ती, संस्थांना पुढे आणत सकारात्मक पत्रकारितेचे वेगळे संदर्भ त्यांनी निर्माण केले आहेत.
पत्रकारिता असो किंवा जीवनाचे कोणतेही क्षेत्र , पुढे जायचे असेल तर आपली रेष मोठी करा , या तत्वावर विश्वास ठेवत वसंत मुंडे यांचा प्रवास सुरु आहे. त्यांनी अनेक उपक्रम राबवून स्वतःतले वेगळेपण सिद्ध केले, मात्र कोणाच्या कोणत्या गोष्टीच्या आड कधी ते आले नाहीत. लोक काय म्हणताहेत याचा फारसा विचार न करता , एखादी गोष्ट आपल्याला पटली आहे, म्हटल्यावर जिद्दीने त्यावर काम करायचे, जे येतील त्यांना सोबत घ्यायचे , जे येणार नाहीत, त्यांच्याबद्दल आकस न ठेवता , जमेल त्यांना सोबत घेऊन आपण ठरवलेले काम करायचे हा त्यांचा स्वभाव.
यातूनच बीडमध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांना यश आले. कोणाचा द्वेष, दुस्वास करायचा नाही. शक्य असेल तर एखाद्याला मदत करायची, पण कोणाबद्दल वाईट चर्चा करण्याच्या किंवा कोणाच्या मार्गात अडथळे आणण्याच्या भानगडीत पडायचे नाही हा त्यांनी स्वतःसाठी आखून घेतलेला मार्ग आहे, आणि त्याच मार्गावरून त्यांचा प्रवास सुरु आहे.
संघटन हा मुळातच अवघड विषय, भल्याभल्यांना ते जमत नाही. आणि त्यातही पत्रकारांचे संघटन म्हटल्यावर तर आणखीच अवघड . मात्र हे अवघड आव्हान वसंत मुंडेंनी स्वीकारले. त्यात त्यांना अनेकांची साथ मिळाली हे खरे आहे. मात्र संघटनांसाठी आवश्यक जो गन असतो, सर्वांचे ऐकून घ्यायचे, सर्वांना सोबत घ्यायचे. कोणाला कोणती गोष्ट जमू शकेल ते ओळखून त्याला त्या गोष्टीला व द्यायचा आणि जमेल त्यांना पुढे आणायचे , यातूनच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची धुरा आज ते समर्थपणे सांभाळत आहेत. राज्यभरातील संपादकांनी बीड सारख्या जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाचे नेतृत्व स्वीकारायचे हे सहज होत नाही. पण वसंत मुंडेंचा स्वभाव, प्रसंगी कटू शब्द सहनकरण्याची क्षमता, अपमान देखील पचविण्याची ताकत आन इ झाले गेले विसरून पुन्हा सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती या अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे हे नेतृत्व राज्यात पोहचले आहे.
पत्रकारितेत आणि पत्रकारितेच्या बाहेर जिथे संधी मिळाली तिथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलाच, पण त्यासोबतच आपल्या मिळालेल्या संधीतून आपण आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या परिसराला काय मिळवून देऊ शकतो, आपल्या संपर्काचा, संबंधांचा आपल्या क्षेत्राला, आपल्या भागाला काय फायदा करून देऊ शकतो याचा त्यांनी सातत्याने विचार केला. अधिस्वीकृती समितीच्या विभागीय अध्यक्षपदावर असताना ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी म्हणून त्यांनी केलेले काम असेल, बीडसारख्या ठिकाणी स. मा. गरज पुरस्काराच्या माध्यमातून सुरु केलेला उपक्रम असेल, व्याख्यानमाला चालविण्याची केलेली धडपड असेल किंवा कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात राज्यभरातील पत्रकार आणि या क्षेत्रातील लोकांच्या अडचणी समजावून घेत, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वाचा फोडण्याचा केलेला प्रयत्न असेल. या साऱ्यांच्या माध्यमातून वसंत मुंडे सर्वांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आलेले आहेत.
या व्यक्तीला स्वस्थ असे ते कधीच बसवत नाही. एक उपक्रम संपला, एक गोष्ट सध्या झाली, कि लगेच स्वतःला दुसऱ्या कोणत्यातरी उपक्रमात, कोणत्यातरी गोष्टीत गुंतवून घेण्याचे काम वसंत मुंडे सातत्याने करीत असतात. त्यांचा पिंडच मुळात धडपडीचा आहे. या धडपडीनेच र्त्यांनी पत्रकारिता क्षेत्राला एक नवा आयाम दिला आहे. पारंपरिक पत्रकारितेला व्यावसायिकतेची, संपर्काची जोड कशी द्यायची हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा या व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजय मालाणी
कार्यकारी संपादक, दैनिक प्रजापत्र