चाळीसगाव, (किशोर शेवरे) – गरीब श्रीमंतीच्या वादातून भाऊ बहिणींच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे, अनेक बहिणी यांना भाऊ असून देखील ते भाऊबीज साजरी करत नाहीत. गेल्या ८ महिन्यांपासून आम्ही कोरोना सारख्या आजाराशी लढत आहोत, मात्र या काळात आमची कुणालाही आठवण आली नाही. मात्र मंगेशदादा हे पहिले आमदार असतील ज्यांनी आम्हाला बहिण मानत भाऊबीज सोहळा घेतला. ज्यांना भावाची उणीव भासत असेल ती मंगेशदादांनी पूर्ण केली आहे. दादा, भाऊबीजेला साडी आणि भेट दिली नाही तरी चालेल, फक्त या बहिणींची सुखदुखात आठवण ठेवा, तुमच्या मदतीचा हात आमच्या पाठीशी ठेवा’ असे भावनिक उद्गार अंगणवाडी सेविका मीनाताई चौधरी यांनी काढले.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाऊंडेशन मार्फत कोरोना काळात जीवाची पर्वा न करता घरोघरी सर्वेक्षण व आरोग्यसेवा देणाऱ्या विविध शासकीय यंत्रणेत अतिशय अल्प मानधन तत्वावर काम करणाऱ्या आरोग्यसेविका यांच्या सन्मानार्थ ‘भाऊबीज’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, नर्सेस आदी १३०० आरोग्यसेविका यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे स्नेहवस्त्र म्हणून साडी, मिठाई व कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर योगाचार्य चंद्रात्रे बाबा, महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ताई ठाकरे, नगरसेविका झेलाताई पाटील, शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, जेष्ठ नेते प्रेमचंद भाऊ खिवसरा, उध्दवराव महाजन, नगरसेवक राजेंद्र आण्णा चौधरी, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेविका विजयाताई प्रकाश पवार, विजयाताई भिकन पवार, माजी पं.स. सभापती दिनेशभाऊ बोरसे, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, जि.पं.सदस्य भाऊसाहेब तात्या जाधव, माजी मार्केट कमिटी सभापती सरदारशेठ राजपूत, नगरसेवक नितीन पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंदजी खरात, सोमसिंग आबा राजपूत, कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब कोळी, फकीरा मिर्झा, बापू अहिरे, पत्रकार एम. बी. मामा, अंगणवाडी संघटनेचे युनियन अध्यक्ष रामकृष्ण पाटील, चिराग शेख, चंदू भाऊ तायडे, आबा पाटील वाघडू, डॉ. देवराम लांडे( THO) प्रशांत मिटकरी( प्रकल्प अधिकारी ICDS ) माजी पं.स. जगनअप्पा महाजन, सरचिटणीस धनंजय मांडोळे आप्पा, अंगणवाडी व आशा सेविकांचे-संघटनेचे पदाधिकारी, वाय आर सोनवणे सर, जगदीश सूर्यवंशी, कैलास नाना, सुनिल पवार, भावेश कोठावदे, भास्कर पाटील, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, चेतन देशमुख, विजय पाटील, अमोल चव्हाण, डॉ.रवींद्र मराठे, निळकंठ मगर या नियोजनात मदत करणारे- अंगणवाडी मुख्य सेविका, आशा सेविका – गटप्रवर्तक व आरोग्य सेविका उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने आमदार झालो, माझा छोटा परिवार आता तालुकाभर मोठा झाला. आमदारकीच्या पहिल्याच वर्षी कोरोना संकट आले. सर्वजण भीतीत असताना, घरात असताना तुम्ही मात्र जीवाची पर्वा न करता फिरत होतात. सुरुवातीला तर बाहेर गावाहून येणाऱ्याजवळ कुणी थांबत नव्हते पण तुम्ही दररोज न चुकता जावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होतात. कधीही न विसरता येण्यासारखे एक पुण्याचे काम तुम्ही केले. यावेळी मी व माझा भाजपा पक्ष पदाधिकारी देखील जनतेसाठी फिल्डवर अन्नसेवा, औषध फवारणी करत होतो. भाजपातर्फे चाळीसगाव तालुक्यातील १ लाख कुटुंबांपर्यंत आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपात आशा सेविका व अंगणवाडी ताई यांनी मोलाची मदत केली. अतिशय अल्प मानधनावर या आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, नर्सेस काम करतात. त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची किंमत करता येणार नाही. आज जे कोरोनावर आपण नियंत्रण मिळविले त्यात सर्वात जास्त योगदान आरोग्यसेविकांचे आहे. शासनाकडे त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या भाऊबीज कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना आश्वस्त करतो की, त्यांचा भाऊ म्हणून शासनाकडे पाठपुरावा करेल वेळ पडली तर मंत्रालयासमोर ठिय्या मांडून सरकारशी भांडेल असा इशारा देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, कोरोना मुळे नात्यांच्या व्याख्या बदलल्या, अनेक रुग्ण दवाखान्यात दगावले मात्र अग्निडाग सुद्धा देता आला नाही इतकी भयाण परिस्थिती होती. कुणी कुणाला विचारत नव्हते. जो आपल्या कामात येईल तोच आपला नातेवाईक असेल, पुढील काळात आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा असून आरोग्यसेवा देणारे देवदूत ठरणार आहेत. समाजात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज आपण एकत असतो ‘हर घर मै है रावण बैठा, इतने राम कहासे लावू…’ अशी परिस्थिती आहे. मात्र माझ्या आरोग्यसेविका बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची धमक देखील माझी आहे. बहिण भावाचे नाते पवित्र असते म्हणून बहिण म्हणून तुमची जबाबदारी स्वीकारतो. ज्ञानोबा माउली जेव्हा उद्विग्न होऊन झोपडीचे दार लावून बसले तेव्हा मुक्ताबाई यांनी ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणत त्यांचे मनपरिवर्तन केले. राजकारणात समाजकारणात कुठे काय होईल सांगता येत नाही पण मुक्ताबाई सारखे तुम्ही या भावाला नेहमीच आशिर्वाद देत राहाल हा मला विश्वास आहे. साडीचोळी स्नेहवस्त्र हे केवळ प्रेमाचे प्रतिक आहे परंतु आमदार या नात्याने माझ्या भगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी साठी मी कटीबद्ध आहे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करेन. आई बहिणीच्या ऋणातून कधीच मुक्त होता येत नाही पण तुम्हाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आगामी काळात जे करता येईल ते निश्चित करेन अशी ग्वाही देतो असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
वसंतराव चंदात्रेबाबा, देवयानीताई ठाकरे, सौ. विजयाताई पवार, दिनेशभाऊ बोरसे, घृष्णेश्वर तात्या पाटील, रामकृष्ण पाटील, अण्णासाहेब कोळी, आबा पाटील, सौ.सुनंदाताई नेरकर यांनी मनोगतातून उपस्थितांशी संवाद साधला. प्रास्ताविक भाजपा शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संगीता मिलिंद देव यांनी केले. आभार प्रदर्शन योजनाताई पाटील यांनी केले.
आमदारांना ओवाळण्यासाठी व सेल्फीसाठी आरोग्यसेविकांची लगबग, भाऊ बहिणींच्या नात्यावर आधारित संगीत मैफिलीने आणली कार्यक्रमात शोभा…
अतिशय भावपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात आमदार मंगेश चव्हाण यांनी आरोग्यसेविका यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरुपात औक्षण करून घेतले. यावेळी भाऊ बहिणीच्या नात्यावर आधारित गाण्यांचे सादरीकरण करणारा ऑर्केस्ट्रॉवर ‘फुलो का तारोका सबका केहना है, एक हजारो मे मेरी बेहना है’ या गाण्यावर उपस्थित महिलांनी टाळया वाजवत साथ दिली. आमदार भाऊ बनून आपल्यात सहभागी झाल्याने आनंदित झालेल्या आरोग्यसेविका यांची आमदार मंगेश चव्हाण यांना औक्षणाचे नारळ देण्यासाठी व मोबाईल मध्ये सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.