गौरवकुमार पाटील / अमळनेर – सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने या वर्षीचा ७३ वा वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात दिनांक ५,६ व ७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. वैश्विक महामारी कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे भारत सरकारने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन हा संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात येत आहे. जगभरातील लक्षावधी भाविक-भक्तगण घरबसल्या ऑनलाईनच्या माध्यमातून हा समागम पाहू शकणार आहेत.
निरंकारी मिशनच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे, की वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित केला जात आहे. ही शुभ सूचना मिळाल्याने समस्त निरंकारी जगतामध्ये हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हर्च्युअल रुपातील या संपूर्ण समागमाच्या कार्यक्रमाचे प्रसारण मिशनच्या वेबसाईटवर दिनांक ५,६ व ७ डिसेंबर रोजी केले जाणार आहे. या व्यतिरिक्त हा समागम संस्कार टी.व्ही. चॅनल वर तिन्ही दिवशी सायंकाळी ५:३० ते रात्री ९ या वेळात प्रसारित करण्यात येईल.
ज्ञात असावे,की ७० वर्षा पासून निरंकारी मिशन संपूर्ण भारतात संत समागम चे आयोजन करत असून लाखो भक्त ह्या सोहळ्यात सहभागी होत असतात आणि आध्यात्मिक आनंद अनुभवतात.या वर्षी निरंकारी समागमाचा मुख्य विषय ‘स्थिरता’ आहे. संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगभरात सत्य, प्रेम, एकत्वाचा संदेश देत आहे. एका बाजुला प्रभु परमात्मा स्थिर आहे, अचल आहे तर दुसऱ्या बाजुला विश्वातील इतर सर्व गोष्टी गतिमान, अस्थिर व परिवर्तनशील आहेत. त्यामुळे स्थिर परमात्म्याशी नाते जोडूनच स्थिरता प्राप्त केली जाऊ शकते. वर्तमान काळातील आधुनिक परिवेशामध्ये हे जगत गतिमान होण्याबरोबरच कुठे ना कुठे अस्थिरही होत चालले आहे. अशा परिस्थितीत मानवी मनाला आध्यात्मिक रुपात स्थिर होण्याची नितांत गरज आहे.
सद्गुरू माता सुदीक्षाजी यांनी जीवनात स्थिरता धारण करण्याविषयी समजावताना म्हटले आहे, की ज्या वृक्षाची मुळे मजबूत असतात तो नेहमी स्थिर राहतो. सोसाट्याचा वारा येवो किंवा वादळ येवो; जर त्या वृक्षाने आपल्या मुळांना घट्ट पकडलेले असेल तर तो स्थिर राहतो. अशाच प्रकारे ज्या मनुष्याने ब्रह्मज्ञान प्राप्त करुन आपले नाते या मूळ निराकार प्रभुशी जोडून ठेवलेले असेल तर त्याच्या जीवनात कशीही परिस्थिती आली तरी तो निराकार प्रभुचा आधार घेऊन स्थिरता प्राप्त करतो.
संत निरंकारी मिशन समाज सेवच्या कार्यामध्ये सदोदित अग्रगण्य राहिलेले आहे आणि त्याबद्दल प्रशंसेलाही पात्र बनलेले आहे. मिशनचे सर्व सामाजिक उपक्रम नियमितपणे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून जनकल्याणासाठी राबविले जात आहेत. त्यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान यांच्या व्यतिरिक्त भूकंप, महापूर, सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीने पीड़ित आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी मिशनकडून भरपूर योगदान दिले जात आहे.कोविड-१९ च्या वैश्विक महामारीच्या काळात संत निरंकारी मिशनने सरकारकडून दिलेल्या निर्देशांचे पालन करत सामाजिक अंतर ठेवणे व मास्कचा वापर करणे (मास्क वापरा निरंतर, ठेवा सामाजिक अंतर) समाजकल्याणाचे अनेक उपक्रम राबवले. यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन, गरजुंना जिवनावश्यक वस्तुंचे (रेशन) वाटप, निरंकारी सत्संग भवन क्वारंटाईन सेन्टर म्हणून प्रदान करणे इत्यादी विविध सेवांचा समावेश आहे. मिशनच्या वतीने प्रवासी शरणार्थी लोकांसाठी (तात्पुरता निवारा) तयार करुन त्यामध्ये त्यांच्या राहण्याची तसेच चहापानाची उचित व्यवस्था करण्यात आली. याशिवाय संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन मास्क तसेच सॅनिटायझरचे वितरण केले. या सेवा सातत्याने सुरु आहेत. देश-विदेशातील निरंकारी भक्तगण या व्हर्च्युअल समागमाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. वर्तमान परिस्थितीलाही ते प्रभु परमात्म्याचा आदेश मानून हसत हसत स्वीकारत आहेत.