जळगाव, दि. 23 – नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून रब्बी हंगाम 2020-21 मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन (Area Approach) राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेत सहभागासाठी रब्बी ज्वारीकरीता 30 नोव्हेंबर, 2020 ही अंतिम तारीख आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवावा. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे, नुकसान भरपाई कृषि आयुक्तालयामार्फत पीक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेतलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल, जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत सहभागासाठी रब्बी ज्वारी 30 नोव्हेंबर, गहु बागायती, हरभरा व रब्बी कांदासाठी 15 डिसेंबर, 2020, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूगसाठी 31 मार्च, 2021 ही सहभागाची अंतिम तारीख आहे. कर्जदार शेतकरी यांनी योजनेत सहभागी न होण्याची व विमा हप्ता कर्ज रक्कमेतुन वजावट करुन विमा कंपनीकडे वर्ग न करण्याची सूचना बँकेला देण्याची अंतिम मुदत ही नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधीपर्यंत आहे.
सर्व अन्नधान्य व गळित धान्य पिकांसाठी संरक्षित रक्कमेच्या 1.5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते आणि कांदा पिकासाठी संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल त्या दराने विमा हप्ता आकारला जाईल. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के इतका राहील.
बागायती गहूसाठी विमा संरक्षित रक्कम 30 हजार रुपये असून शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 450 रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. बागायती व जिरायती ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये तर शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 360 रुपये प्रति हेक्टर, हरभरा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 27 हजार रुपये, शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 405 रुपये प्रति हेक्टर, उन्हाळी भुईमुगसाठी विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये, शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 525 रुपये प्रति हेक्टर, रब्बी कांदासाठी विमा संरक्षित रक्कम 60 हजार रुपये तर शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 3 हजार रुपये प्रति हेक्टर इतकी आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगाम 2020-21 मध्ये सदरची योजना भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कंपनी लि. मिलेनियम स्टार 309, 310, 111 बिल्डींग, ढोले पाटील मार्ग, रुबी हॉल क्लिनिकजवळ, पुणे, महाराष्ट्र-411 001 टोल फ्री क्र – 1800 103 7712 यांचेमार्फत राबविण्यात येत आहे.
रब्बी हंगाम 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी सहभागी होण्यासाठी जवळच्या बँकेत, आपले सरकार सेवा केंद्र, जे. डी. सी. सी. बँक यांचेशी संपर्क करुन सहभाग नोंदवावा. अथवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वत: सहभाग नोंदविण्याची सुविधा आहे. कर्जदार शेतक-यांचा हप्ता संबंधित बँकेव्दारे भरला जाऊन सहभाग नोंदविला जातो.
अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँक, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव, आकाशवाणी शेजारी, शासकीय इमारत येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्री. ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.