देशभरातील विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
जळगाव – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्षाच्या सत्राला सुरवात झाली. यावेळी गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. अनामिक शाह, दिशाबेन पटेल, प्रो. गीता धरमपाल, गांधी रिचर्स फाऊंडेशच्या अंबिका जैन उपस्थित होत्या.
या अभ्यासक्रमासाठी देशभरातील विविध राज्यातून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी परिचय करून देताना सामाजिक समानता, सांप्रदायिक एकता, कृषी आधारित जीवन पद्धती, स्त्री-पुरुष समानता या सारख्या सामाजिक विषयांवर नाटीका सादर केल्यात. देशातील विविध राज्यातून आलेल्या या तरुणांनी आपापल्या राज्याची वेशभुषा देखील सादर केली. यावेळी बोलताना प्रो. अनामिक शाह म्हणाले, गांधी रिसर्च फाऊंडेशनव्दारा सुरू असलेल्या या अभ्यासक्रमातून युवकांच्या विचारांना निश्चितपणे सकारात्कम दिशा मिळणार आहे. येथून बाहेर पडताना या विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक भान जागृत झालेले असेल. गांधीजींच्या विचारांतील भारताच्या उभारणीसाठी हे तरुण नक्कीच हातभार लावतील. प्रा. गीता धरमपाल यांनी देखील शहर आणि ग्रामीण भागातील विषमता यासारख्या अभ्यासक्रमांतून कमी होण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अंबिका जैन म्हणाल्या, तरुणांच्या सकारात्मक विचारांतूनच देशात सामाजिक आणि वैचारिक परिवर्तन घडणार आहे. त्यासाठी हा अभ्यासक्रम पुरक ठरणार आहे. यावेळी डॉ. रंजना शाह, गांधी रिचर्स फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन यांच्यासह फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. या अभ्यासक्रमाचा परिचय डॉ. चेन्ना दुराई यांनी करून दिला तर अश्विन झाला यांनी आभार मानले.
असा आहे अभ्यासक्रम
गांधी रिसर्च फाऊंडेशनव्दारा चालविण्यात येणाऱ्या ‘पी. जी. डिप्लोमा इन सस्टेनेबल रुरल रिकन्स्ट्रक्शन’ या अभ्यासक्रमात पहिले सहा महिने थेअरी शिकवली जाते त्यात प्रामुख्याने गांधीयन थॉट, सोशलवर्क मेथड, गांधीयन केस स्टडी, रचनात्मक कार्य या बरोबर देशात दोन ठिकाणी एक्स्पोजर व्हिजीट केली जाते तसेच स्कॉलरशीप देखील दिली जाते. उर्वरित सहा महिन्यात पुर्णपणे प्रॅक्टीकल दिले जाते. त्यामध्ये कम्युनिटी स्टे या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी निवडलेल्या गावांत जाऊन राहणे अपेक्षित आहे. तेथील समस्यांचा अभ्यास करून त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करणार आहेत.