ना.डॉ.गुरुमुख जगवानी यांचा पुढाकार…
जळगाव – भारतातील ५ पाकिस्तानी सिंधी नागरिकांना महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष ना.डॉ.गुरुमुख जगवानी यांच्या पुढाकाराने भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले आहे. मुंबई येथे मंत्रालयात त्यांना राष्ट्रीय नागरी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
भारत-पाक फाळणीनंतर अनेक सिंधी कुटुंब विस्थापित झाले होते. विस्थापित पाकिस्तानी सिंधी बांधवांना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी आजवर महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष ना.डॉ.गुरुमुख जगवानी शासनाकडे पाठपुरावा करीत असतात. गेल्या वर्षी त्यांच्या पाठपुराव्यामुळे १८ नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळाले होते.
शनिवारी मंत्रालयात डॉ.जगवानी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्याचे अपर मुख्य गृह सचिव संजय कुमार, मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते ५ जणांना राष्ट्रीय नागरी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यामध्ये अमरावती येथील राणीबाई वासवानी, शांतीबाई केसवानी, अनिता केसवानी, जळगावच्या रिटाबाई सिंधी व कोल्हापूरच्या प्रज्ञा मूलचंदानी यांचा समावेश आहे.
विभाग अधिकारी दीपक खरात यांनी सांगितले की, केंद्राच्या २०१६ च्या अधिसूचनेनुसार पाकिस्तानातून आलेल्या भारतीय सिंधी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, ठाणे येथील जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. अशी माहिती खरात यांनी दिली.
भारत-पाक युद्धापासून भारतीयत्वासाठी संघर्ष करणाऱ्या सिंधी नागरिकांनी डॉ.गुरुमुख जगवानी यांचे आभार मानले आहे.