१८४६ साली ह्याच दिवशी विश्वातील पहिली ” भूल ” रुग्णाला दिली गेली ! ईथर ह्या भूल देणाऱ्या ओषधाच्या माध्यमातून विल्यम्स थॉमस ग्रीन
मार्टिन ह्या डॉक्टरांनी जाहीररीत्या म्यसेच्यूसेट ( बोस्टन , यु एस ए )च्या खुल्या ऑपरेशन थिएटर मध्ये शल्यक्रिया यशस्वी केली.
” We have conquered pain “ अर्थात ” आम्ही मिळवला वेदनेवर विजय !”अश्या हेडलाईन्स ने दुसऱ्या दिवसाच्या वृत्तपत्रांनी ह्या ऐतिहासिक बदलाची नोंद घेतली.
कारण त्यापूर्वी कुठलीही शल्यक्रिया हि भूल न देता ,रुग्णास पकडून , वेदनेमुळे प्रचंड विव्हळणाऱ्या रुग्णाच्या आवाजात ,भयंकर अश्या स्थितीत पार पडत होत्या.
अर्थात त्या काळात युद्धात जखमी झालेल्या सैनिकावर व गँगरीन झालेल्या रुग्णावरच शल्यक्रिया होत असत ! कारण इतर कुठल्याही आजारासाठी लागणाऱ्या शल्यक्रिया करणेसाठी हिंमत होतच नव्हती कारण होणारा अतिभयंकर त्रास व त्याच वेळेस जीव जाण्याची भीती सन १८४६ ते आजच्या २०२० सालापर्यंत भूलवैद्यक शास्त्राने प्रचंड प्रगती केली व मानवाला आधुनिक ओषधींच्या माध्यमातून , विविध प्रगत तंत्रांच्या व मशिनरी च्या माध्यमातून अचूक परिणाम साधणारी , वेदनेवर विजय मिळवणारी व अल्प धोका असलेली सुलभ भूलप्रणाली बहाल करण्याचे मोलाचे काम केले आहे.
असे असले तरी आजही ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये , रुग्णांमध्ये भुलावैद्यकशास्त्राबद्दल बरेच गैरसमज आहेत , अनामिक भीती आहे !
त्याचबरोबर ह्या शास्त्राबद्दल माहिती नसल्यामुळे अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या भुलेस सामोरे जातांना बर्याच अडचणी येतात !
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अतिप्रगत व अनमोल अश्या ” भूलवैद्यक शास्त्राबद्दल ” जागरूकता यावी म्हणून हा प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील लेख
(१) भूलतज्ञ् हा टेक्निशयन असतो कि डॉक्टर ?
-आजही आपल्या देशातील बर्याच नागरिकांना शल्यक्रियेआधी लागणाऱ्या भुलेसाठी बोलावण्यात आलेले व्यक्ती हे शल्यक्रिया करणाऱ्या डॉक्टरांपेक्षा वेगळे असतात व ते उच्चशिक्षित व प्रशिक्षित असे डॉक्टर्स असतात हे माहितीच नसते !
एमबीबीएस ह्या पदवीनंतर दोन किंवा तीन वर्षे पदविका किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉक्टरच अश्या प्रकारची भूल ( ऍनेस्थेशिया )देऊ शकतात !
(२) भूलतज्ञ् हा रुग्णास कुठल्याही पूर्वतयारीशिवाय कधीही भूल देऊ शकतो ?
–नाही
एखाद्या रुग्णास शल्यक्रियेसाठी भूलेची जरूर असल्यास पूर्वतयारी करूनच ती द्यावी लागते ! रुग्णास कोणती भूल द्यावी लागेल , पूर्वीपासून काही आजार आहेत का ? विशेष अश्या काही गोळ्या चालू आहेत का ? काही गोळ्या व इंजेक्शन काही दिवस आधी बंद करण्याची गरज आहे का? रुग्णास काही ओषधांची एर्लजी आहे का?पूर्वी काही मोठे ऑप रेशन झालेले आहे का ? त्यावेळेस दिल्या गेल्या भुलेचा काही त्रास झाला होता का ?भूल देण्याच्या प्रकियेसाठी अतिमहत्वाचे म्हणजे श्वासनलिकेत टाकण्यात येणाऱ्या नळीसाठी तोंड उघडते कि नाही ? त्यात काही अडचणी येऊ शकता का ?मणका सरळ आहे कि नाही ? शारीरिक स्थितीत काही सुधारणा करण्याची गरज आहे का ?, रक्त चाचण्या व आवश्यक असलेले फिटनेस प्रमाणपत्र बरोबर आहे का ?रक्त चढविण्याची गरज आधी आहे किंवा शल्यक्रियेच्या वेळेस ह्या सर्व बाबींचा विचार करून पूर्वतयारी करावी लागते !शल्यक्रियेसाठी लागणाऱ्या भुलेपूर्वी सर्वसाधारणपणे रुग्णास ४ ते ६ तास उपाशी राहण्याचा सल्ला द्यावा लागतो व तो त्याने बरोबर पाळला कि नाही ह्याची खात्री केल्यानंतरच ज्या ठिकाणी सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे त्या ठिकाणीच नियोजित भूल हि द्यावी लागते !(३) भूल देणे म्हणजे रुग्णास फक्त एका ओषधाने बेशुद्ध करणे असा आहे का ?
– नाही
भूल देणे म्हणजे बेशुद्ध करण्याबरोबरच वेदना दूर करणे , स्नायू शिथिल करणे , व ऑपरेशनची संपूर्ण प्रकिया स्मृती विरहित करणे , तणाव दूर करणे व ह्या दरम्यान शरीरातील सर्व महत्वाच्या अवयवांवर अर्थात त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे असा होतो !
व ह्या साठी निरनिराळ्या ओषधांचा वापर केला जातो !
(४) भूल दिल्यावर भूल देणारे डॉक्टर तिथून दुसरीकडे निघून जातात हे खरे आहे का ?
– नाही
भूल दिल्यानंतर संपूर्ण शल्यक्रियेदरम्यान रुग्णाच्या शारीरिक स्थितीवर एकाग्रपणे लक्ष ठेवणे व संपूर्ण भूल दिली असल्यास शल्यक्रियेनंतर त्या रुग्णास त्यातून बाहेर काढून पूर्ववत स्थितीत आणण्याचे काम संबंधित भूल देणाऱ्या डॉक्टरांचं असते !
एवढेच नव्हे तर शल्यक्रियेपश्चात वेदनाशामक इंजेक्शन सुचविणे , उलटी होऊ नये म्हणून काळजी घेणे व एकंदरीत त्या रुग्णाच्या शारीरिक स्थितीवर लक्ष ठेवण्याचे काम व जबाबदारी तो भूलवैद्यक डॉक्टर पार पाडत असतो !
(५) शल्यक्रिया चालू असतांना भूल संपून जाणे किंवा अपूर्ण
पडणे वा पूर्ण भुलेतून अचानक जाग येण्याची शक्यता असते का ?
– नाही
आधुनिक तंत्र व प्रगत प्रणाली मुळे संपूर्ण भुलेत असे प्रकार सद्यस्थितीत होत नाही !
शल्यक्रियेच्या भागापुरती ( लोकल , स्पायनल , हातापुरती )भूल दिली असल्यास अपवादात्मक परिस्थितीत तश्या भुलेची मात्रा कमी होत असल्यास तिचे रूपांतर संपूर्ण भुलेत हि करण्याचे तंत्र आज अवगत आहे ! आणि संपूर्ण शरीराला दिलेली भूल हि बरेच तास आपले काम सुरळीतपणे व सुरक्षित पणे पार पाडू शकते !
(६) प्रत्येक रुग्णाला एकच प्रकारची भूल दिली जाते तर फी मात्र एकसारखी का घेतली जात नाही ?
-प्रत्येक रुग्णाला वेगवेगळी भूल दिली जाते . संपूर्ण शरीराला बेशुद्ध करणारी भूल , फक्त कंबरेखालील भागाला बधिर करणारी भूल , हाताच्या शल्यक्रियेसाठी फक्त हात बधिर करण्याची भूल ( ज्यात रुग्ण शुद्धीवर असतो पण वेदनारहित असतो ) किंवा ज्या भागाची शल्यक्रिया तोच भाग बधिर करण्याची भूल असे भुलेची विविध प्रकार आहेत.
शरीराच्या कुठल्या भागावर शल्यक्रिया पार पडणार आहे ?, पूर्वीचे आजार , शल्यक्रियेचा कालावधी , अतिजोखमिची शल्यक्रिया , नियोजित अथवा अतितातडीची शल्यक्रिया व कुठली भूल त्या रुग्णास सुरक्षित असेल त्याप्रमाणे भूल दिली जाते व स्वाभाविकपणे त्याप्रमाणे भुलेची फी हि वेगवेगळी आकारली जाते !
(७) भूल देण्याचे काम हे फार सोपे असते ?
– नाही
भूल देण्याचे काम हे अतिशय जोखमीचे , रुग्णाच्या जीवनरेषेशी निगडित असे असते !
एकाग्रता , जागरूकता व शरीरातील सर्व क्रिया प्रक्रिया वर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेला अभ्यासूपणा ह्या माध्यमातूनच भूल देणारे डॉक्टर एखाद्या वैमानिकासारखे हे अतिशय अवघड असे काम करत असतात.
एखाद्या रुग्णाच्या शल्यक्रियेच्या वेळी अचानक उद्भवलेल्या गुतांगुतीला सामोरे जातांना भूल देणारे डॉक्टर हे आपल्या स्वतः च्या रक्तदाबावर ( जो तणावामुळे प्रचंड वाढू शकतो ) नियंत्रण ठेऊन, हताश न होता , त्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करत असतात.
(८ ) भूलवैद्यक डॉक्टरांचे कार्यक्षेत्र फक्त ऑपरेशन थिएटर पर्यंतच असते का ?
– नाही
भूलवैद्यक क्षेत्र व ह्यात काम करणारी डॉक्टर्सं ह्यांच्या कार्याचा परीघ हा सध्यस्थितीत प्रचंड वाढलेला आहे !
(अ )अतिगंभीर रुग्णाला वाचविण्यात अहोरात्र सेवा देणारे व कुत्रिम व्हेंटिलेटर्स व इतर अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणाली युक्त असे ” अतिदक्षता गृह ” ( क्रिटिकल केअर्स ) , शल्यक्रिया पश्चात अतीगंभीर रुग्णाला गरज असल्यास सेवा देणारे इंटेसिव्ह केअर युनिट , कोरोनरी केअर युनिट , गर्भारपणातील व डिलिव्हरीनंतरच्या गुंतागुंतीची काळजी व उपचार करणारे केअर युनिट मध्ये हि भूलवैद्यक डॉक्टरांची भूमिका महत्वाची असते
(ब) ऑपरेशन थिएटर बरोबरच सिटीस्कॅन व एम .आर.आय .सेंटर , कॅथ लैब येथे गरज लागल्यास भूल देणे ,मनोविकार डॉक्टरांकडे शॉक देणेसाठी भूल देणे , डिलिव्हरीच्या वेळेस वेदनारहित प्रसूतीसाठी इंजेक्शन देणे , जुनाट नसा व मणक्याचे दुखणे , कर्करोगाच्या तीव्र वेदना ह्यावर पेन क्लिनिक च्या माध्यमातुन उपचार करणे , न्यायवैद्यक बाबीसाठी असलेल्या नार्को टेस्ट मध्ये भूल देणे अश्या विविध ठिकाणी भूलशास्त्राची गरज पडते.
(क )अवयव प्रत्यारोपण मोहिमेत अवयव काढ़णेकामी , मेंदूमृत जाहीर करणेसाठी , अवयव एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी प्रशिक्षित अश्या भूलवैद्यक डॉक्टरांची गरज असते.
(ड ) अतिमहत्वाच्या राजकीय व मोठ्या संवैधानिक पदावर असलेल्या महानुभावांसाठी , त्यांच्या सोबत सुसज्ज अश्या जीवनरक्षक प्रणालीची. अचानक गरज पडल्यास भूलवैद्यक डॉक्टर ह्यांची उपस्थिती असणे बंधनकारक असते.
त्याचप्रमाणे मोठमोठे कार्यक्रम , रॅली , म्येरॅथॉन , यात्रा ( ज्या ठिकाणी आपदकालीन परिस्थिती उदभवू शकते ) अश्या ठिकाणी भूलवैद्यक डॉक्टर ह्यांची उपस्थिती आवश्यक असते .
कारण कुठल्याही अश्या व भूकंप , मोठे अपघात ह्या ठिकाणी अचानक उदभवणाऱ्या आपत्कालीन स्थितीत सर्वसामान्य नागरिकांचे जीव वाचविण्याचे काम भूलवैद्यक डॉक्टरच करू शकतात कारण जीवनरक्षक प्रणालीचा वापर करण्यात हेच निष्णात असतात !
(इ ) रुग्णालयाबाहेर , एखाद्या निरोगी व्यक्तीचे ह्रदय जर अचानक बंद पडले तर ते पुन्हा तत्काळ पूर्ववत करण्याची प्रणाली ( compression only life support ), ज्यात फक्त हाताचा वापर केला जातो व रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच हि प्रक्रिया केली जाते अश्या ह्या जीवरक्षक प्रणालीचा प्रचार व प्रसार सर्वसामान्य नागरिकांमध्ये करण्याचे कार्य भूलशास्त्रात कार्य करणारे डॉक्टर्स आज करत आहेत व ह्याचा फायदा दिसून येत आहे !
(९) भूलवैद्यक क्षेत्रात काम करण्याऱ्या डॉक्टरांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी फारसे भांडवल / गुंतवणूक लागत नाही ?
– काही अंशी हे खरे आहे इतर शाखेच्या मानाने फार मोठे भांडवल लागत नसले तरी आजच्या काळातील भूलवैद्यक डॉक्टर मात्र स्वतः च्या मालकीचे साहित्य , यंत्रसामुग्री , व्हेन्टिलेटर्स ह्याचा वापर करत असल्यामुळे व अशी उपकरणे महाग असल्यामुळे थोडे फार भांडवल लागतेच . त्याचप्रमाणे मोबदल्यात मिळणारी फि हि मात्र तुटपुंजी असते.
व्यावसायिक सुरक्षा कवच म्हणून काढण्यात येणाऱ्या विमा सरंक्षणाचें प्रीमियम हे भूलशास्त्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचे हे इतर शाखेच्या डॉक्टरांपेक्षा प्रचंड जास्त असतात हे विशेष
(१०) भूलवैद्यक डॉक्टर्स ह्यांना इतर शाखेतील डॉक्टरांच्या तुलनेत जनमानसात मान -सन्मान , ओळख , प्रतिष्ठा कमी मिळते का ?
– असे चित्र पूर्वी होते हे खरे आहे व स्वाभाविकच होते. कारण भूलवैद्यक क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स हे ” पडद्याच्या मागे ” काम करणारे असतात . रुग्णाशी नेहमी संबंध येत नसतो , सुसंवाद हि नसतो , स्वतः चे रूग्णालय नसते , आपल्या कामाची जाहिरात नसते. आपले काम झाले कि दुसऱ्या ठिकाणी घाईघाईत निघून जाणे हे अपरिहार्य असते त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये फारसा मान – सन्मान अथवा वेगळी अशी ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरतात हे वास्तव आहे.
मात्र गेल्या पाच सहा वर्षांपासून ह्यात आशादायक बदल घडून येत आहे ! भूलशास्त्राबद्दल जाणून घेण्यास सर्वसामान्य नागरिकांमध्ये हि उत्सुकता दिसून येत आहे व भुलावैद्यकशास्त्रात काम करणारे डॉक्टर्स हि ह्याबाबत प्रबोधन करत असतानांच विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत.
आपण केलेल्या कामाबद्दल प्रतिष्ठा व सन्मान मिळावा हि अपेक्षा मात्र भूलवैद्यक डॉक्टर्स फारशी बाळगत नाही कारण एखाद्या तीव्र वेदनेने विव्हळत असलेल्या रुग्णास वेदनाशामक इंजेक्शन दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आलेले स्मित भाव , एखाद्या रुग्णाला जीवनदान मिळाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी अनपेक्षितपणे धरलेले पाय असे अनुभवच भूलवैद्यकडॉक्टरांना एक आत्मिक समाधान देत असतात.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व स्व . पु . ल . देशपांडे ह्यांनी भूलशास्त्राबद्दल आपले विचार मांडताना असे मत व्यक्त केले होते कि
पूर्वीच्या काळातील संत व त्यांचे स्थान व आजच्या काळातील भूलवैद्यक डॉक्टरांचे स्थान हे एकाच बरोबरीचे आहे. संतांनी मनुष्याला अध्यात्माच्या माध्यमातून मानसिक ताण तणाव ,मानसिक वेदना ह्यापासून मुक्ती देण्याचे कार्य केले तर आजच्या काळात शारीरिक
वेदनांपासून मुक्ती देण्याचे कार्य भूलवैद्यक डॉक्टर्स ह्या शास्त्राच्या माध्यमातून करत आहे.
आज जागतिक भूलवैद्यक शास्त्र दिन
त्यानिमित्त सर्व भूलवैद्यक क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांना समर्पित…
डॉ.नरेंद्र ठाकूर
एम . डी . ऍनेस्थेशिया
राज्य कार्यकारणी सदस्य
महाराष्ट्र राज्य भूलवैद्यक शास्त्र संघटना
जळगाव
संपर्क सूत्र : ९८२३१३७९३८