मुंबई – चित्रपट विश्वातील नामांकित असा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती मराठमोळ्या वेशभूषकार भानू अथैय्या यांचे आज मुबंई येथे निधन झाले.भारताला पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार भानू अथय्या यांनी मिळवून दिला होता.
भानू अथय्या यांच्या विषयी थोडक्यात….
भानू अथैय्या (पूर्ण नाव – भानुमती आण्णासाहेब राजोपाध्ये) (जन्म : कोल्हापूर, २८ एप्रिल १९२६) या चित्रपट क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ऑस्कर पुरस्कार विजेत्या भारतीय वेषभूषाकार होत्या.
भानू अथैय्या यांच्या आईचे नाव शांताबाई होते. वडील अण्णासाहेब राजोपाध्ये छत्रपतींचे पुरोहित होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून भानुमतींनी चित्रकलेशी दोस्ती केली. तर त्याच दरम्यान त्यांनी ‘एकादशी महात्म्य’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. भानुमती ९ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची चित्रकलेविषयीची आवड पाहून त्यांच्या आईने घरीच चित्रकलेसाठी शिक्षक ठेवले. शालेय शिक्षण संपताच त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. शेवटच्या वर्षी त्यांना सुवर्णपदक मिळाले.