पाचोरा- भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार काल दिनांक २८ रोजी आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा व भडगाव तालुका येथील महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्याचे कळते,परंतु वेळोवेळी ट्रान्सफार्मर खराब होऊन ते तात्काळ दुरुस्त करून दिले जात नाहीत तसेच त्यासाठी लागणारे ऑइल व इतर सामुग्री देखील महावितरणाकडे उपलब्ध नसल्याचे कारण नेहमी संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. ही अडचण गेल्या चार ते पाच महिन्यांपासून शेतकरी व सामान्य नागरिकांना सहन करावी लागत असून त्यांना याचा गंभीर परिणाम सोसावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य नागरिकांनी आमच्यापर्यंत संबंधित विभागाच्या व त्यातील अधिकाऱ्यांच्या तक्रारी करून त्यांना येणाऱ्या अडचणी आमच्यापर्यंत मांडल्या, याविषयी स्थानिक महावितरण अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून त्यांना भारतीय जनता पार्टी तर्फे निवेदने देखील देण्यात आले तसेच बऱ्याचदा अधिकाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क करून देखील स्थानिक अधिकाऱ्यांनी कुठलीही उपाययोजना किंवा पर्यायी मार्ग यातुन काढला नाही. त्यामुळे पाचोरा व भडगाव या तालुक्यांना आमदार आहेत की नाही असा संभ्रम जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
त्यासंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक २४ सप्टेंबर २०२० रोजी जळगाव महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुक शेख साहेब व मुख्य अभियंता महावितरण जळगाव यांना निवेदन देऊन पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी व सामान्य नागरिकांना सोसावा लागणार त्रास व समस्यांची निवेदनाद्वारे मांडणी करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. आणि मा.अधीक्षक अभियंता फारुक शेख साहेब यांनी लवकरात लवकर पाचोरा भडगाव तालुक्यात येऊन प्रत्यक्ष पाहणी करून सर्व समस्या मार्गी लावू असे आश्वासित केले आणि याविषयाची दखल घेत प्रत्यक्ष येऊन पाहणी देखील केली परंतु आपले आमदार महोदय फक्त घरात बसून कुठलीही प्रत्यक्ष कृती न करता स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना करून शेतकरी व सामान्य नागरिकांच्या समस्यांबाबत फक्त नौटंकी करीत आहेत राज्यात सरकार त्यांचे आहे मा.मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे आहेत परंतु त्यांच्या अकार्यक्षमतेचा परिणाम या पाचोरा व भडगाव तालुक्यातील जनतेला सोसावा लागत आहे. अशी घणाघाती टीका यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली.तसेच भडगाव तालुक्यातील कोठली येथील 132 के.व्ही.चे उप-विद्युत केंद्र जवळपास पूर्णत्वास येत आहे. परंतु त्या उप-विद्युत केंद्र साठी लागणारा विद्युत पुरवठा कुठल्या विद्युत केंद्रावरून होणार यासाठी शासनदरबारी प्रस्ताव प्रलंबित असून त्याबाबत कुठलाही निर्णय आजपावतो झाला नसल्याचे कळते कदाचित ह्या गोष्टीची आमदारांना कल्पना नसावी किंवा कल्पना असतानाही त्यांची ते मंजूर करून आणण्याची इच्छाशक्ती नसावी असे दिसून येत आहे. कारण या संपूर्ण मंजुरीसाठी अजून तरी सात ते आठ महिने कालावधी लागू शकतो, त्यासोबतच शासनाच्या HVDS ह्या योजनेतून शेतकऱ्यांना कृषी वीज पंपाची सुविधा मिळणार असून इतर जिल्ह्यांसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ आपल्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कसा मिळवून देता येईल यासाठी आमदार महोदयांचे कुठलेही योगदान दिसत नाही.
तसेच गेल्या वर्षीचा काही शेतकऱ्यांचा कापूस,मका,आणि हरभरा घरात पडून राहिलेला असतानाच आता काही दिवसांपासून पाचोरा आणि भडगाव तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातले आहे. दोघे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्नाचा हाता-तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून नेला आहे. त्यामुळे कष्टकरी शेतकरी व त्यावर अवलंबून असणारा मजूर वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. माहे जून पासून सुरुवात झालेल्या पावसाने शेतीकामाला दिलासा दिला परिणामी शेतकरी आनंदित झाला,त्यामुळे जमेल तिथून पैसा उपलब्ध करून शेतकऱ्यांनी कापूस,मका,ज्वारी, उडीद,मूग,सोयाबीन व यांच्यासह लिंबू,मोसंबी,केळी व अन्य फळ पिकांची लागवड केली दोन्ही तालुक्यातील पिकांची स्थिती उत्तम असताना मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले अहोरात्र पडणाऱ्या पावसाने पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे संपूर्ण शेतात पाणी साचले,उभी पिके नष्ट झालीत ती काळी पडली आणि सडली आहेत,त्यामुळे शेतीमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे या पावसामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील अनेक गावांत माती व कुडाच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन काही घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत.या संदर्भात शेतकऱ्यांचा शेतीचा तसेच पडलेल्या घरांचा आजपावतो प्रशासनाकडून कुठलाही पंचनामा झाला नसून तालुक्यातील शेतकरी व मजूर वर्ग यासाठी आशेने बसला आहे.
या संदर्भात देखील भारतीय जनता पार्टीने दिनांक २४ सप्टेंबर २०२० रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपटातात्या भोळे,जिल्हा परिषद अध्यक्ष मा.ना. रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी या संदर्भात मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांना आग्रही मागणीचे निवेदन दिले परंतु आमदार महोदयांनी यासंदर्भात फक्त मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून शेतकऱ्याची बोळवण केली. राज्यात त्यांची सत्ता असून मा. मुख्यमंत्री व कृषिमंत्री त्यांच्या पक्षाचे असतानादेखील आमदारांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. त्यांनी फक्त सर्व सामान्यांच्या समस्यांबाबत नौटंकी लावलेली असून सामान्य जनता तसेच कष्टकरी शेतकरी व मजूर यांच्या मनात तालुक्याला आमदार आहे की नाही हा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव यांच्यावतीने आव्हान करतो की त्यांनी शेतकरी मजूर व सामान्य जनतेच्या समस्या लवकरात-लवकर मार्गी लावाव्यात आणि जर त्यांनी सर्व समस्या मार्गी लावल्यातर आम्ही भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव यांच्यावतीने त्याबद्दल त्यांचा चौकात जाहीर सत्कार करू आणि जर त्यांच्या कडून शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसतील तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असे आवाहन यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले,