जळगाव (प्रतिनिधी) – येथील बहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे श्रावण महिन्यानिमित्त दि. १५ जुलै ते १९ जुलै दरम्यान पाच दिवसीय ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिना आणि शिवआराधना हे एक समीकरणच आहे. धार्मिक अधिष्ठान असलेल्या या महिन्यात बहुसंख्य महिला सोळा सोमवारचे तसेच प्रदोषाचे व्रत करतात. त्यांना स्वतः सहजरित्या पूजा करता यावी म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सौ.सुधाताई श्रीकांत खटोड यांनी पुष्पदंत गंधर्व रचि शिवमहिमा स्त्रोतातील प्रत्येक श्लोक व त्याचा अर्थ अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत निरुपण केले. तसेच देवाची षोडशोपचारे पूजा करतेवेळी म्हणावयाचे मंत्र, आसनपूजन, कलशपूजन करताना कोणते मंत्र म्हणावे, देवाचे आवाहन कोणत्या मंत्राने करावे. पाद्य, आचमन यासह क्षमायाचना मंत्र याविषयी सहभागी महिलांना शास्त्रशुध्द माहिती दिली.
ऑनलाईन असलेल्या या शिबिरात महाराष्ट्रासह गुजरात, ओडीसा, पश्चिम बंगाल या भागातील दीड हजार महिलांचा प्रतिसाद लाभला होता. शिबिर आयोजनासाठी बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्या सल्लागार सौ.स्वातीताई कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले होते. शिबिराचे सूत्रसंचालन बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या सचिव सौ.वृंदा भालेराव यांनी केले. कोरोनाच्या प्रकोपातून सर्वांची सुटका व्हावी, अशी भगवान शंकराला प्रार्थना करून शिबिराचा समारोप करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा सौ.अमलाताई पाठक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.