जळगाव, दि. 20 – धरणगाव शहरातील कोरोना कोविड सेंटरमधून आज एकाचदिवशी 15 कोरानाग्रस्त रूग्ण पूर्ण बरे झाल्याने त्यांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे उपस्थितीत मिठाई, मास्क व सॅनिटायझर देऊन घरी पाठवण्यात आले.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जगावर, देशावर आणि राज्यावर कोरानाचे संकट आले असून या संकटावर मात करण्यासाठी एकजुटीने सज्ज आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे. प्रशासनातील प्रत्येक घटक यासाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढून कोरोना बरा होतो हे लक्षात ठेवून त्यास धीराने तोंड देण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 2149 गेली असली तरी यापैकी 1339 रूग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. ही समाधानकारक बाब आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 89 रूग्ण बरे झाले आहे. यातील 15 रूग्ण धरणगाव कोविड सेंटरमधील आहे. या रूग्णांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे उपस्थितीत मिठाई, मास्क आणि सॅनिटायझर देऊन निरोप देण्यात आला.
याप्रसंगी नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी,
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील, भाजपाचे गटनेते कैलास माळीसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी एका कोरोनामुक्त व्यक्तीने आपल्या मनोगतात या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांपासून तहसीलदारांपर्यंत सारे सकाळ, दुपार, सायंकाळ भेट देत होते. रूग्णांची विचारपूस करीत होते. डॉक्टरांकडून रूग्णांची सतत चौकशी होत होती. चहा, नाश्ता, जेवण वेळेवर येत होते तर रात्री दूध, अंडी मिळत होती. इथे आल्यानंतर कोरोनाची भिती पूर्णपणे निघून गेली. दहा दिवस कसे निघून गेले ते कळले नाही. येथे आम्ही एका परिवारासारखे राहिलो पालकमंत्र्यांनी आम्हाला हिंमत दिली आणि कोरोनाची भिती मनातून निघून गेली असल्याचेही या कोरोनामुक्त व्यक्तीने सांगितले.
डॉ उल्हास पाटील रूग्णालयातूनही 18 कोरानामुक्तांना निरोप
जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या 450 खाटा या कारोना रूग्णांसाठी अधिग्रहीत केलेल्या आहेत. या अधिग्रहित करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मधून आज प्रथमच एकाचदिवशी 18 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले. या कोरोनामुक्त रूग्णांना घरी पाठवण्यात आले.
यावेळी घरी परतत असतांना एका महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, आपणास येथे चांगली सेवा मिळाली. रूग्णांकडे पूर्णपणे लक्ष दिले गेले. जेवण, औषधे ही वेळेवर मिळत असल्याने कोणतीही चिंता नव्हती. असे सांगून सहकार्य करणा-या सर्वांचे त्यांनी आभार मानले. यावेळी या कोरोनामुक्त रूग्णांचे टाळयांच्या गजरात स्वागत केले गेले.
जिल्ह्यातील कोरोना बाधित
रुग्णांवर सर्व कोविड सेंटरमध्ये तातडीने व वेळेवर उपचार होत असल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील 1339 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
जिल्ह्यात तालुकनिहाय आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची माहिती
जळगाव शहर- 253
जळगाव ग्रामीण- 31
भुसावळ- 203
अमळनेर- 183
चोपडा-113
पाचोरा-33
भडगाव- 81
धरणगाव- 61
यावल -68
एरंडोल- 35
जामनेर-76
रावेर-90
पारोळा- 83
चाळीसगाव- 16
मुकताईनगर -10
बोदवड -11
इतर जिल्ह्यातील- 2 याप्रमाणे एकूण 1339 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचा दर 62% इतका आहे. हा दर देशाच्या व राज्याच्या दरापेक्षा अधिक आहे.
असे असले तरी नागरिकांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लाॅकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित रहावे. अनावश्यक गर्दी टाळावी. सुरक्षित अंतर राखावे. मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.