पंढरपूर.दि.19: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. शासनाच्या निर्देशानुसार परंपरा अबाधित राखत मानाच्या पालख्यांना परवानगी दिली आहे. याखेरीज अन्य भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपूरात येऊ नये असे आवाहन पालकमंत्री श्री. भरणे यांनी केले आहे.
कोरोना विषाणू प्रसाराला अटकाव करण्यात पंढरपूर येथील अधिकारी यांनी विविध उपाययोजना करुन उल्लेखनीय यश मिळविले आहे. या ‘पंढरपूर पॅटर्न’ची जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे आज दिल्या.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भारत भालके, प्रशांत परिचारक, दत्तात्रय सावंत, यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, नगराध्यक्ष साधना भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, शमा पवार, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, पंढरपूर तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या योग्य नियोजन, कडक अंमलबजावणी,नियमांचे काटेकोर पालन आणि योग्य समन्वय करुन ‘पंढरपूर पॅटर्न तयार केला आहे. या पॅटर्नमुळे पंढरपूर तालुक्याने कोरोना विषाणूच्या प्रसारावर मात केली आहे. यासाठी शासनस्तरावर अजून काही आवश्यक ती मदत लागली तर उपलब्ध करुन देण्यात येईल. आरोग्य विभागाने अधिकारी कर्मचारी यांची कमतरता भासणार नाही यांची दक्षता घेऊन तात्काळ कार्यवाही करुन कंत्राटी पद्धतीने अधिकारी कर्मचारी यांची भरती करावी. तसेच कंत्राटी आरोग्य सेविकांचे मानधन तात्काळ द्यावे. जिल्ह्यात कोरोना बाबत करण्यात येणाऱ्या उपायोजनांबाबत निर्माण होणा-या समस्या स्थानिक पातळीवर सोडवाव्यात तसेच जिल्ह्यात नवीन रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता संबधितांनी घ्यावी.
शासनाकडून देण्यात येणारे विविध प्रकारचे अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या नावावर जमा करावे. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे वाटप व विम्याची रक्कम उपलब्ध करुन द्या. शासनाच्या दिलेल्या सूचनंनुसार शाळा सुरु करण्याबाबत योग्य नियोजन करा अशा अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी बैठकीत दिल्या. यावेळी आमदार भारत भालके यांनी कोविड रुग्णालयाबात योग्य निर्णय घ्यावा तर शाळा सुरु होण्यापूर्वी शहरी व ग्रामीण भागातील शाळा तपासून घ्याव्यात असे सांगितले. आमदार दत्तात्रय सावंत यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत नियोजन करावे असे सांगितले यावेळी प्रशांत परिचारक यांनी अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे वाटप करा असे सांगितले.
यावेळी कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी यावेळी दिली .