अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वयाची पस्तीशीही पार न केलेल्या सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याने त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही पण गेल्या काही दिवसांपासून तो तणावात असल्याचे सांगितले जात आहे.
त्याने सर्वप्रथम किस देश में है मेरा दिल नावाच्या मालिकेत काम केले होते. परंतु, त्याला एकता कपूरच्या मालिका पवित्र रिश्ता मालिकेतून ओळख मिळाली. यानंतर त्याला चित्रपटाचे प्रस्ताव येऊ लागले. काय पो चे चित्रपटात तो मुख्य अभिनेता होता आणि त्याच्या अभिनयाचेही कौतुक केले गेले. त्यानंतर तो वाणी कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्यासमवेत शुद्ध देसी रोमांसमध्ये दिसला. हा चित्रपट यशस्वी झाला आणि सुशांतच्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात झाली.
सुशांत सिंह राजपूतचा जन्म २१ जानेवारी १९८६ ला बिहारमधील पटना येथे झाला होता. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होती. २००० च्या दरम्यान राजपूत परिवार दिल्लीत आला. सुशांतला ४ बहीणी असून, त्यातील एक मितू सिंह ही राज्यस्तरावरील क्रिकेट खेळाडू आहे. सुशांतचे प्राथमिक शिक्षण सेंट कॅरेंस हायस्कूल पटना येथे झाले तर माध्यमिक शिक्षण दिल्ली येथील कुलाची हंसराज मॉडेल स्कूल येथे झाले. त्यानंतर दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून त्याने मॅकेनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना तिसऱ्या वर्षात शिक्षण सोडले.
चित्रपटात काम करण्याची ओढ त्याला मुंबईला घेऊन आली. येथे प्रसिध्द नृत्यदिग्दर्शक श्यामक डावर यांच्या नृत्यशाळेत त्याने नृत्याचे धडे गिरवले. सुशांतची कारकिर्द नायकाच्या मागे कोरसमध्ये नृत्य करण्यातून झाली. २००६ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ खेळाच्या उद्घाटन समारंभातील कार्यक्रमात ही नृत्यसमूहासह सामील झाला होता. ५१ व्या फिल्मफेअरच्या कार्यक्रमात कोरसमध्ये नृत्य करत असताना बालाजी टेलिफिल्मस्च्या कास्टिंग टीमचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यानंतर किस देश में है मेरा दिल या दूरचित्रमालिकेतील प्रीत जुनेजा या भूमिकेने तो छोट्या पडद्यावर अवतरला. त्यानंतर मिळालेली झी टी.व्ही.वरील पवित्र रिश्ता या मालिकेने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळवून दिली. तो डान्स रिॲलिटी शो जरा नच के दिखा २ आणि झलक दिखला जा ४ मध्ये दिसला. काय पो चे या चित्रपटाच्या रुपाने सुशांतने रुपेरी पडद्यावरील आपली वाटचाल सुरु केली. त्यानंतर त्याने शुध्द देसी रोमांस, पी.के., केदारनाथ, छिछोरे या चित्रपटातून केलेल्या भूमिकांचे खूप कौतुक झाले. त्याला प्रसिध्दी मिळवून देणारी भूमिका होती भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्रसिंह धोनी यांच्या बायोपिकमधील महेंद्रसिंह धोनीची भूमिका. या चित्रपटाने संपूर्ण देशात त्याला अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली.
त्याच्या आगामी दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्या डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटात तो ब्योमकेश बक्षीची भूमिका करणार होता. 14 जून २०२० ला आपल्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या नोकराने पोलिसांना दिली. सुशांतच्या आत्महत्येने हिंदी चित्रपटसृष्टी व त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)