पाचोरा, (प्रतिनिधी)- खासदार उन्मेष पाटील यांनी पाचोरा भडगाव पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेले निवेदन म्हणजे स्वतःचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न असून त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये असे खडे बोल आमदार किशोर पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदारांना सुनावले आहेत .
खासदार उन्मेष पाटील,आमदार राजूमामा भोळे यांचेसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केलेले अनेक आरोप आणि मागण्या या बिनबुडाच्या असून कापूस खरेदी आणि पिक विम्याबद्दल करण्यात आलेले मुख्य आरोपांबद्दल बोलताना आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की कापूस खरेदी सीसीआय नियंत्रणात जर केली जात असेल तर सीसीआयवर पूर्णपणे केंद्राचे नियंत्रण आहे आणि खासदार स्वतः केंद्रात असताना जर औरंगाबादला त्यांना वारंवार फोन करावे लागत असतील तर हे त्यांचे स्वतःचे अपयश आहे. याशिवाय पाचोरा मार्केट कमिटीत भाजपचे सभापती असून प्रत्यक्षात प्रत्येक गावात जाऊन पंचनामा केल्यानंतर 3246 कापूस उत्पादक शेतकरी तसेच पाचोरा येथील 1855 तर भडगाव येथील 2300 मका ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची अधिकृत नोंदणी झालेली असताना 20000 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या कुठून आणल्या असादेखील सवाल आमदार किशोर पाटील यांनी उपस्थित केला.
पिक विमा योजना प्रत्यक्षात पंतप्रधान पिक विमा योजना आहे त्यामुळे ही देखील केंद्राची योजना असून जिल्हा दूध संघ देखील भाजपाच्या ताब्यात असल्याने या मागण्या करून खासदारांनी स्वतःचेच अपयश स्वतः कबूल केले असल्याचे त्यांनी म्हटले. खासदार हे केवळ पाचोरा भडगाव मतदार संघासाठी मर्यादित नसून जळगाव जिल्ह्याचे खासदार असल्यामुळे त्यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून जळगावलाच पिक विमा कंपनीचे ऑफिस सुरू करावे असेही ते म्हणाले. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा शहरात संशयित किंवा पॉझिटिव्ह एकही कोरोना रुग्ण शहरात नसल्याबद्दल समाधान व्यक्त करताना बांबरुड येथील पोद्दार पॉलीटेक्निक इमारतीला शंभर बेडचे हॉस्पिटल निर्माण केले गेले असून याठिकाणी पाचोरा आणि भडगाव शहरातील रुग्णांवर इलाज केले जाणार असून आठ दिवस पाचोरा आणि आठ दिवस भडगाव शहरातील डॉक्टर या रुग्णांवर उपचार करणार असल्याचे सांगतांना पाचोरा आणि भडगाव शहर कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.