जळगाव (प्रतिनिधी) – महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत जळगाव जिल्ह्यातील 33 रूग्णालये समाविष्ट करण्यात आले असून या रूग्णालयात जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांस कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास मोफत उपचार मिळणार आहे.
नॉन कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यातील 33 हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची सोय
जिल्ह्यातील नॉन कोविड रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता जिल्ह्यातील तेहतीस रुग्णालयांचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. या योजनेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकास कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास त्यांनी त्वरित नजीकच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. त्यांच्यावर या रूग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रूपांतर कोविड19 हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्याने नॉन कोविड रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत. यासाठी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 33 रुग्णालये समाविष्ट करण्यात आली आहेत. या रुग्णालयांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांवर करण्यात येत असलेल्या विविध आजारांवर ज्याप्रमाणे मोफत उपचार करण्यात येत होते त्याचप्रमाणे या रुग्णालयांमध्ये ही मोफत उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ या रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घ्यावेत. कोरोणा विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहेत. याकरिता राज्य शासनाने 30 जुलै 2020 पर्यंत राज्यातील सर्व नागरिकांचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत केलेला आहे. जेणेकरून कोणीही नागरिक उपचारापासून वंचित राहू नये. याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
दहा वर्षापेक्षा लहान मुले व
65 वर्षावरील नागरिकांना कोरोणाचा प्रादुर्भाव लवकर होत असल्याने त्यांनी ताप, सर्दी, खोकला, दम्याचा त्रास होत असेल तर त्यांनी तातडीने उपचार करून घेणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले आहेत.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मृत्युदर जास्त असल्याने नागरिकांनी खबरदारी म्हणून तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. याकरिता आरोग्य यंत्रणेमार्फत नागरिकांचे घरोघरी जाऊन सव्हेक्षण करण्यात येत आहे. घरी येणा-या यंत्रणेला नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सत्य माहिती पुरवावी. कुटूंबातील व्यक्तीस काही त्रास असेल, जुना आजार असल्यास यंत्रणेच्या निदर्शनास आणून द्यावे. जेणेकरून अशा व्यक्तीवर त्वरित उपचार सुरू करता येतील.
जीवनदायी आरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचारासाठी कुठल्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास त्यांनी त्वरित जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपायोजना अवलंबित आहे. तथापि,
जिल्हावासियांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. त्याचबरोबर बाहेर फिरताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा. विनाकारण घराबाहेर पडू नये. जेणेकरून कोरोणाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल. असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जिल्हावासीयांना केले आहे.