जामनेर,(बाळू वाघ) – तालुक्यातील अवैध वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असून लॉकडाऊन काळातही अवैध वृक्ष तोड होत असून दिवसा ढवळ्या वाहतूकही होत असल्याचे आज पहूर-वाकोद रस्त्यावरील “सॉ मिल” मध्ये लाकूड मालाचे भरले वाहन खाली करतांना देखील आढळून आल्याने जामनेर वनविभाग याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे समजते.
सर्वत्र कोरोना संसर्गाचा कहर सुरु असतांना शासनाने अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त सर्वच बंद चे आदेश देऊनही आज दि. 29 रोजी वाकोद नजीक असलेल्या “सॉ मिल”मध्ये अवैध लाकूड मालाचे भरलेले वाहन देखील खाली होतांना आढळून आल्याने जामनेर वनविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
या ठिकाणी येणाऱ्या लाकूड मालाला पास देखील वन विभागाच्या शासकीय कार्यालयातून देण्यात आलेली नाही असे खुद्द वाहतूक करून आणणाऱ्या व्यापाऱ्याने प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. जामनेर वन विभागाच्या आशिर्वादाशिवाय “सॉ मिल” मालक अवैधरित्या तोडलेले लाकूड घेऊ शकत नाहीत अशी माहिती आहे.
वृक्षतोडीचा परवाना घेऊन झाड तोडल्यानंतर वन विभागातर्फे जागेवर पंचनामा करून तोडलेल्या लाकडावर विशिष्ट पद्धतीची खूण केली जाते. त्यानंतर लाकूड वाहतूक करण्याचा परवाना देण्यात येतो. “सॉ मिल” चालकांनी परवाना असलेल्या वाहनातून आणलेले लाकूड विकत घ्यावे व त्याचे अद्ययावत रेकॉर्ड ठेवावे, हे रेकॉर्ड वन विभागाकडे सादर करावे, असा नियम आहे. तपासणीसाठी सर्व रेकोर्ड “सॉ मिल”मध्ये उपलब्ध ठेवावे लागते.
येथील सॉ मिलमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड आहे. मात्र, वन विभागातर्फे करण्यात येणारी खूण या लाकडावर दिसत नाही. हे लाकूड अवैधरित्या वृक्षतोडीचे असण्याची शक्यता आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वय कारवाई होणे अपेक्षित
कोरोना संसर्ग काळातही सदर “सॉ मिल” चालकांनी नियम झुगारून अवैध वृक्ष तोडीचा वाहनातून विना परवानगी वाहतूक करत असल्याने यातील दोषी सॉ मिल” चालक व वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 1860(45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार कारवाई होणे अपेक्षित आहे.