जळगाव, दि. 25 – जळगाव जिल्ह्यात कपाशी पाठोपाठ मका, ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. पणन हंगाम सन 2019-20 (रब्बी) मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य (मका, ज्वारी) खरेदी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. जिल्ह्यात भरडधान्याच्या साठवणूकीसाठी किमान दोन लाख बारदानाची आवश्यकता आहे. लाॅकडाऊनमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर बारदान उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एक अभिनव कल्पना मांडून त्यास मुर्तस्वरूप दिल्याने दोन लाख बारदान उपलब्धतेचा प्रश्न तर सुटलाच शिवाय शेतक-यांचे धान्य वेळेत खरेदी केले जाणार असून स्वस्त धान्य दुकानदारांकडे पडून असलेल्या चांगल्या दर्जाच्या बारदानास शासकीय दर मिळणार आहे.
पणन हंगाम सन 2019-20 करीता शासनाने किमान आधारभूत किंमती जाहिर केल्या आहेत. या आधारभूत किंमतीचा शेतक-यांना लाभ होण्याच्यादृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीस धान्य विकावे लागू नये यासाठी राज्य शासनाने ज्वारी आणि मका खरेदीसाठी खरेदी केंद्र उघडणेबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात एकूण 18 केंद्रांना भरडधान्य खरेदीसाठी मंजुरी द्यावी असा प्रस्ताव जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी तातडीने या सर्व केंद्रांना मंजूरी दिली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक केंद्र यासाठी मंजूर करण्यात आले आहे.
या केंद्रांवर खरेदी करण्यात येणारे भरडधान्य साठवणूकीसाठी जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी 2 लाख गोण्यांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. Corona Virus (Covid – 19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने बारदान उपलब्धतेचा प्रश्न प्रशासनापुढे होता. खरेदी केलेल्या भरड धान्याची साठवणूक करणेसाठी बारदान उपलब्धता हे एक प्रशासनापुढे आव्हानच होते. बारदानाशिवाय धान्याची साठवणूक, यासाठी तातडीने निधी उपलब्ध करणे, तातडीने बारदानाची वाहतूक संबंधीत केंद्राकडे करणे अशा अशक्यप्राय प्रश्नांची सोडवणूक प्रशासनास करावी लागणार होती. तथापी जिल्हाधिकारी डॅा. अविनाश ढाकणे यांनी या प्रश्नांची सोडवणूक अतिशय सहजरित्या केली.
सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत जिल्हा प्रशासनाकडून रास्त भाव दुकानदारांमार्फत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना, सद्यःस्थितीत लागू असलेली एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी सवलतीच्या दरात गहू आणि तांदूळ उपलब्धतेची योजना आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत उपलब्ध होणारा तांदूळ लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. रास्त भाव दुकानदार या धान्याचे वाटप केल्यावर शिल्लक राहिलेले बारदान बाजारात ज्याप्रमाणे दर असेल त्या भावात विकत असतात. Corona Virus (Covid – 19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध धान्याचे वाटप लक्षात घेता रास्त भाव दुकानदारांकडे असणा-या रिक्त झालेल्या बारदानांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. लाॅकडाऊनमुळे सद्यस्थितीत बारदान मार्केटमध्ये विक्री करणे रास्त भाव दुकानदारांना शक्य नसल्याने हे बारदान दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणावर पडून होते. या शिल्लक बारदानातून दुकानदारांनी उपयोगी बारदान प्रशासनाला उपलब्ध करून दिले तर प्रशासनाचा प्रश्न चुटकीसरशी सुटणार होता. नेमकी हिच बाब जिल्हाधिकारी यांनी हेरुन दुकानदारांकडून शिल्लक बारदान उचलणेबाबत पुरवठा विभागास सुचना दिल्या. शिल्लक बारदान त्वरीत उचलले जाणार असल्याने दुकानदारांकडे देखील येणारे पुढील धान्य साठवणूकीसाठी जागा उपलब्ध होणार असून दुकानदारांना शिल्लक बारदान शासनाकडे जमा केल्यावर शासन स्तरावरुन उचित मोबदला देखील मिळणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी या संदर्भात जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांना त्यांचेकडे शिल्लक असलेले उपयोगी बारदान संबंधीत तहसिल कार्यालयाच्या गोदामात उपलब्ध करुन द्यावे असे निर्देश दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात एकूण 1938 रास्त भाव दुकानदार असून प्रत्येक दुकानदाराने किमान 100 ज्युट बारदान उपलब्ध करुन दिल्यास प्रशासनास दोन लाख बारदान भरडधान्य साठवणुकीसाठी त्वरीत उपलब्ध होणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या अभिनव संकल्पनेमुळे प्रशासनाची नविन बारदान खरेदीसाठी लागणाऱ्या निधीची मोठ्या प्रमाणावर बचत झाली असून बारदान उपलब्धता त्वरीत व केंद्राचे ठिकाणीच उपलब्ध होणार असल्याने बारदान उपलब्धता कालावधी व बारदान वाहतूकीचा प्रश्न निकाली निघाला आहे. शिवाय बारदानाअभावी भरडधान्याच्या खरेदीत अडथळा आला असता तोही येणार नाही. त्यामुळे शेतक-यांचा माल तातडीने खरेदी केला जाणार आहे.
जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले असून जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदार याकामी प्रशासनास सहकार्य करीत असून त्यांचेकडील चांगल्या दर्जाचे बारदान तहसील कार्यालयातील गोदामात जमा करीत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी दिली आहे.