जळगाव – आगामी विधानसभा निवडणूकित जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिषेक पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
आगामी विधानसभा निवडणुकीत आय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ची आघाडी झाल्यास जळगाव शहर विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार असल्याचे समजते.तर अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडून लढू इच्छिणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. राज्यभरातील प्रत्येक मतदारसंघातून चांगले उमेदवार शोधण्यासह ज्यांना स्वतःहून विधानसभा लढवण्याची इच्छा आहे, अशांचे अर्ज संकलनही सुरू केले आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मतदारसंघ निहाय उमेदवारांची नावे अंतिम करण्याचे पक्षाचे नियोजन असल्याचे सांगितले जाते. इच्छुकांचे अर्ज स्थानिक पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे देण्यासह पक्षाच्या प्रदेश कार्यालयात ऑनलाइनही पाठविण्याचा पर्याय ठेवला गेला होता.जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी प्रदेश कार्यालयाकडे उमेदवारी साठी अर्ज पाठवल्याचे कळते.लवकरच जिल्ह्यातील एकूण उमेदवारी मागणी अर्जांची संख्या व इच्छुकांची नावे स्पष्ट होणार आहेत.असे असले तरी जळगाव शहर मतदार संघातून भाजपा, सेनेच्या उमेदवाराच्या तोडीस तोड उमेदवार देण्याचे आव्हान काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाकडे आहे.
जळगाव विधानसभा शहर मतदार संघातून इच्छुक असलेले उमेदवार अभिषेक पाटील यांचे पक्षासाठी केलेले काम, संघटन कौशल्य,नेतृत्व करण्याची क्षमता तसेच युवा चेहरा पाहता यांना पक्षाकडून संधी दिली जाऊ शकते.त्यांना पक्षाने संधी दिल्यास पक्षात उमेदवारीवरून नाराजी पण उमटणार नाही असेच वाटते.तसेच अभिषेक पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपा,सेनेच्या उमेदवारां समोर तगडे आव्हान उभे राहील यात शंका नाही.