रेल्वे व बांधकाम विभागाच्या वतीने प्राथमिक पाहणी ; खा. उन्मेष पाटील यांनी दिल्या सूचना
पंचवीस हजार शहरवासी व करगाव तांडा ग्रामस्थांची अडचण होणार दूर
चाळीसगाव – गेल्या शंभर वर्षांपासून चाळीसगाव हून धुळ्याकडे जाणारी रेल्वे मार्गाच्या खाली तसेच चाळीसगाव होऊन पाचोराकडे जाणाऱ्या मुख्य रेल्वे मार्गाच्या खाली अशा दोन भुयारी मोरी शहरालगत अस्तित्वात आहेत. मात्र या मोऱ्यांचा आतला गाभा हा ब्रिटिश कालीन पद्धतीचा असल्याने येथून फक्त रिक्षा कार मोटर सायकल बैलगाडी व पादचारी वाहनांसाठी आवागमन करणे शक्य होते.
मात्र तत्कालीन आमदार व खासदार उन्मेष पाटील यांनी या अडचणीच्या पाठपुरावा करत या दोन्ही पूलांच्या भुयारी मार्गाचे बांधकाम तातडीने व्हावे यासाठी रेल्वे विभागाकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्या अनुषंगाने आज राज्य सरकारने अर्थसंकल्पात या दोन्ही भुयारी मार्गाच्या कामासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.नुकतेच खासदार उन्मेष पाटील यांच्या सह रेल्वे विभाग वरिष्ठ अभियंता हरीश जोशी , सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता नवनाथ सोनवणे, शाखा अभियंता योगेश आहिरे यांनी प्रत्यक्ष साईट पाहणी केली असून लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. पावसाळ्यात तसेच वर्षभर अडचणींचा सामना करणाऱ्या नागरिक व ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या या अडचणीतून सुटका होणार असल्याने परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
या भुयारी मार्गाची पाहणी प्रसंगी पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते संजय पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, करगाव ग्रामपंचायत सदस्य दिनकर राठोड,राजुभाऊ पाटील उंबरखेडकर, अमोल नानकर, अमित सुराणा,रवींद्र पाटील, अनिल विसपुते, बबडी शेख ,कैलास गावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
अनेक वर्षापासूनची अडचण दूर होणार असल्याचा आनंद खा. उन्मेष पाटील
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे मार्गाच्या पलिकडे राहणारे शहरवासी तसेच आयटीआय साठी जाणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांना मुलींना व कॉलेज ट्रॅक वर जाणाऱ्या व्यायामपटूना तसेच गणपती मंदिरावर जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय वर्षानुवर्षांपासून होत होती. त्यातच अरुंद मोरी असल्याने वाहनांची कोडी होत होती ही अडचण पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर निधीची मंजुरी मिळाली असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त करतो. आज अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली त्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. दोन्ही भुयारी मार्गांचे बांधकाम होऊन नागरीकांची शहरवासीयांची अडचण दूर होत असल्याचा आनंद आहे. अशी भावना खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली आहे .
याबाबतची सविस्तर माहिती अशी की चाळीसगाव शहरातून करगाव रोड कडे जाणारा रस्ता अस्तित्वात आहे चाळीस पन्नास वर्षांपूर्वी करगाव नाका म्हणून येथे नगर परिषदेच्या कर वसुलीसाठी नाका आजही अस्तित्वात आहे. रेल्वे मार्गाच्या खालुन जाणारी मोरी अतिशय अरुंद असल्याने त्यातच वर्षानुवर्षापासून या मोरी परिसरातील दोन्ही बाजूंचे रस्ते मोरी पेक्षा उंच झाल्याने या सखल भागातील पाणी मोरीमध्ये साचून राहिल्याने पावसाळ्यात येथून वापरणे कठीण झाले होते यासाठी या परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने निवेदने दिली होती ही अडचण तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी हेरली होती.यासाठी रेल्वे विभागाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन व पालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या मार्गावरील भुयारी मार्गाबाबत कशा पद्धतीने काम करता येईल त्याचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभागाने तयार करावा असा आग्रह खासदार उन्मेष पाटील यांनी वेळोवेळी लावून धरला होता याच भागात पाचशे मीटरच्या अंतराने दोन रेल्वे मार्गाच्या समावेश असल्याने प्रचंड गैरसोय या भागातील नागरिकांना सहन करावी लागत होती.
असा असेल रेल्वे भुयारी मार्ग
पाहणी प्रसंगी अभियंता नवनाथ सोनवणे यांनी या कामाची प्राथमिक माहिती दिली. आर यू बी अर्थात रेल्वे अंडर ब्रीज हा सेंट्रल रेल्वे मार्ग व धुळे रेल्वे मार्ग अशा दोन्ही मार्गा खालून चार मिटर अथवा साडे आठ मिटर आकाराचे आर आर सी सी चे बॉक्स तायार करून ते या मार्गा खाली ढकलून टाकले जातील तसेच त्यावर गर्डर टाकून रेल्वे चा मार्ग पूर्ववत केला जाईल. आधीचे दोन ट्रॅक होते त्यात एकाची भर पडून हे तिहेरी रेल्वे मार्ग चा समावेश करूनच दहा कोटीं चा आराखडा तयार करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागा चे अभियंता योगेश आहिरे यांनी सांगितले. खासदार उन्मेष पाटील यांनी ताबडतोब पुढील कामाच्या हालचाली गतिमान कराव्यात अडचण आल्यास सरळ सरळ माझेशी संपर्क साधावा. मात्र लागलीच कामाला सुरुवात करावी अशी सूचना उपस्थित अभियंता यांना दिली. साडे पाच ते पाच मिटर उंची राहणार असल्याने त्या खालून मोठ्या गाड्या देखील सहज प्रवास करतील. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पंचवीस हजार नागरिकांना दिलासा
आदर्श नगर, म्हाडा कॉलनी, विष्णु संगीत नगर ,श्रीकृष्ण नगर, आयटीआय कॉलेज परिसर, टाकळी प्र चा गावाचा वामन नगर चा परिसर, पन्नास वर्षापासून असलेली शेकडो लोकांची भिल्ल वस्ती, डीजी नाना नगर, कृष्णा वर्ल्ड सिटी तसेच गणपती मंदिर परिसरातील नागरिकांना , तसेच दर्शनासाठी ये जा करणाऱ्या भाविकांना या गैरसोयीचा सामना वर्षानुवर्षांपासून करावा लागत होता पावसाळ्यात इथून वावरणे कठीण होत असल्याने या नागरिकांना सुमारे दोन किलोमीटरच्या फेऱ्याने शहरात यावे लागत होते ही अडचण प्रस्तावित काम मंजूर झाल्याने दूर होणार आहे करगाव तांडा येथील सुमारे दहा ते पंधरा हजार ग्रामस्थांना देखील येथून वावरणे जिकरीचे होते. अनेकदा वाहनाच्या कोंडीने येथून मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. ट्रॅक्टर मोठ्या वाहनांना या मोरीतून प्रवेश करता येत नसल्याने या अरुंद मोऱ्याच्या अडचण आता नाहीशी होणार असून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य मार्ग १९ करगाव रस्ता इजिमा ६७ वर रेल्वे खालील मोठ्या भुयारी मार्गाचे अंडर ब्रिज बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नुकताच दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.