चाळीसगाव, – तालुक्यातील दहिवद शाखेच्या जे.डी.सी.सी.बँक येथे कायम स्वरूपी बँक कर्मचारी न मिळाल्यास उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसिलदार अमोल मोरे यांना शिवसेनेच्या वतीने दि. 11 रोजी देण्यात आले.
दहिवद जे.डी.सी.सी.बँक शाखेचा विस्तार जर पाहिला तर दहिवद,कुंझर,आभोणे,कळमडू,चिंचगव्हाण अशी ५ मोठी गावे तसेच ९ दुधाच्या डेअरी,जळगाव फेडरेशनचे धुळे जिल्ह्याचे ३ गावे,पारोळा तालुक्याचे २ गावे एवढी मोठी शाखा असल्यावर देखील याठिकाणी कायम स्वरूपी कर्मचारी नसल्यामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात हाल होत आहेत.काही शेतकरी कुटुंबाच्या ७/१२ उताऱ्यावर ४ ते ५ जणांची नावे असतात,अशा शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या अभावांमुळे अनुदान लवकर मिळत नाही तसेच पिक कर्ज,वि.का.सोसायट्यांचे कर्ज लवकर मिळत नाही.शेतकरी वर्ग बँकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली तर रोजंदारी बँक कर्मचाऱ्यांना या संदर्भात अधिकार नसल्यामुळे शेतकरी कुटुंबाना उद्धटपणे उत्तरे देवून परत पाठवितात.सदरील बँकेची BSNL सेवा,तसेच इंटरनेट सेवा हि नेहमी बंद स्वरूपात असल्यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.बँकेने दुसऱ्या कंपनीचे नेट सुविधा घेऊन शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी.जेणेकरून शेतकर्यांना पिक कर्ज व वि.का.सोसायटीचे कर्ज लवकर मिळावे अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे.
तसे न झाल्यास दहिवद जे.डी.सी.सी.बँक समोर दि.१८ मे २०२० सोमवार रोजी सकाळी १० वाजता उपोषण करणार असल्याचे निवेदनात देण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख व दहीवद येथील उपसरपंच नानासाहेब भिमराव हरी खलाणे, हिंमत निकम(तंटा मुक्ती अध्यक्ष),गोरख पवार(जिल्हाध्यक्ष, माहिती सेवाभावी संस्था)उपस्थित होते.