मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- : कोरोना संसर्गजन्य महामारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी येथील तहसिल कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी दुपारी 3:30 ते 4:30 वाजेपर्यंत जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली . या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालया अंतर्गत 3 कोविड केअर सेंटर ची निर्मिती करण्यात आली आहे मात्र येथे पी.पी.ई. किट व इतर साहित्य संपले असून लेखी मागणी केली असतांनाही साहित्य उपलब्ध झाले नव्हते ही बाब पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास येताच पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाशल्य चिकित्सक यांना भ्रमणध्वनीवरुन चांगलेच खडसावले व संध्याकाळ पर्यंत सदर साहित्य मुक्ताईनगर येथे पोहोचलेच पाहिजे अश्या कडक शब्दात ताकीद दिली .त्यामुळे सर्वांचे लक्ष साहित्य येण्याकडे लागले होते .पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडक शब्दातील समज मिळाल्याने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात सायं 6:15 वाजताच म्हणजे अवघ्या अडीच तासात अत्यावश्यक साहित्य रुग्णवाहिकेद्वारा दाखल झाले .
सदर साहित्य येथे दाखल होताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार हे साहित्य शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई , शहर संघटक वसंत भलभले, शहरप्रमुख गणेश टोंगे , गटनेता राजेंद्र हिवराळे , दिलीप पाटील , नगरसेवक संतोष मराठे , स्वीय सहायक संतोष कोळी , शुभम शर्मा, मनोज मराठे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे यांच्या ताब्यात दिले .