भुसावळ (धम्मरत्न गणवीर) – लॉकडाऊनमुळे राज्यात अडकून पडलेल्या परराज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ई-पासची व्यवस्था केली असून त्यासाठी मजुरांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आले आहेत.
मात्र हातावर पोट भरणाऱ्या बऱ्याच मजुरांकडे मोबाईल नाहीत, तसेच ज्यांच्याकडे मोबाईल आहे, त्यांनाही ई- पाससाठी ऑनलाईन फॉर्म भरता येत नसल्यामुळे या मजुरांची प्रचंड हाल होत आहे. तसेच फॉर्म भरला तरी काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने हे मजूर हवालदिल झाले आहेत. ई पाससाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधूनही काहीही रिप्लाय मिळत नाही त्यामुळे या मजुरांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
नागरिकांचे मेडिकल चेकअप करूनच त्यांना गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. त्यासाठी नगरपालिका दवाखान्यात संत गाडगेबाबा रुग्णालयात गर्दी होत असल्याने मेडिकल सर्टिफिकट मिळवण्यासाठी नागरिकांना सकाळपासून सायंकाळपर्यंत चांगलीच कसरत करावी लागत आहे.