चाळीसगाव (किशोर शेवरे)- कोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन अधिक प्रभावी व्हावा तसेच पोलिस यंत्रणेवर पडणारा ताण कमी व्हावा यासाठी चाळीसगाव तालुक्यातील सैन्य दलातील निवृत्त झालेल्या माजी सैनिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे नुकतेच पोलीस ग्राउंड वर बोलावण्यात आलेल्या बैठकीत चाळीसगाव तालुक्यातील माजी सैनिकांना ओळखपत्र व नियुक्ती पत्राचे वाटप आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले त्याप्रसंगी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे, तहसीलदार अमोल मोरे, चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, पंचायत समिती गटनेते संजय पाटील आदी उपस्थित होते.
देशाच्या सीमा रक्षणासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देणारे सैनिक हे देशावर आलेल्या कोरोना सारख्या संकट काळात निस्वार्थपणे व कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पुढे येतात ही निश्चितच अभिमानाची बाब असून त्यांचे हे योगदान चाळीसगाव वाशिय कायम स्मृतीत ठेवत कृतज्ञ रहातील असे प्रतिपादन आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी केले तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये पोलीस अधिकाऱ्यास अधिकार कामे व विशेष अधिकार आहेत तेच विशेष पोलीस अधिकारी यांना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्षेत्रात असून दिलेल्या जबाबदारीचे शासनाच्या निर्देशानुसार पालन करावे व कुठल्याही प्रकारे अधिकाराचा गैरवापर न होऊ देता आपले कर्तव्य पार पाडावे अशा सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांनी दिल्या.