जळगाव (प्रतिनिधी)दि.29 :- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कोरोनाच्या आपत्तीमुळे त्यांनी कुणाकडूनही शुभेच्छा न स्वीकारता दिवसभर विविध उपक्रमांना हजेरी लावली.
पीपीई किटचे केले वाटप
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व जण घरात बसले असून अनेक गरजूंना मदतीची अपेक्षा आहे. नेमक्या याच बाबींना लक्षात घेऊन पाळधी जिल्हा परिषद गटामध्ये या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गटातील डॉक्टर्स तसेच आरोग्य खात्याचे अन्य कर्मचारी हे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटत आहेत. अर्थात, त्यांना स्वत:ला संसर्गाचा धोका असल्याने यापासून प्रतिकार करण्यासाठी त्यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यात खासगी व सरकारी डॉक्टर्सचा समावेश होता.
सॅनिटायझर, मास्क वाटप व अन्नदान
पाळधी जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींनी मागणी केल्यानुसार प्रत्येकी पाच लीटर सॅनिटायझर पुरविण्यात येत असून याच उपक्रमास मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. यासोबत हँडवॉश व मास्कचे वाटप देखील करण्यात आले. पाळधी आऊटपोस्ट पोलीस चौकी व हॉटेल गोविंदा यांच्या संयुक्त विद्यमाने दोनगाव येथील वंचित घटकांना अन्नदान करण्यात आले. तर मंगळवारीच अमळनेर येथे आकस्मिक भेट दिल्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या पुत्राच्या प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाबूबेन बाबूलाल शहा गोशाळेला १ लाख १० हजारांचे दान केले. याच्या मदतीने ६ हजार गरजूंना घरपोच अन्न पोहचवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद देत पाळधी येथील डॉ. स्वप्नील पाटील यांनी दिवसभरातील ओपीडीची कमाई अर्थात ११०० रूपये मदत केली. याच्या सोबत पाळधीचे सरपंच प्रकाश पाटील यांनी ११००, माजी सरपंच अरूण पाटील यांनी २१०० रूपयांची मदत प्रतापराव पाटील यांना प्रदान केली. स्वत: प्रतापराव पाटील यात आपल्या मदतीची भर टाकून ही रक्कम लवकरच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाठविणार आहेत.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पाळधी बुद्रुकचे सरपंच प्रकाश पाटील, खुर्दचे चंदू माळी, माजी सरपंच अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य नामदेव माळी, डॉ व्ही, डी, पाटील, डॉ स्वप्नील पाटील, डॉ भूषण पाटील, डॉ प्रवीण झंवर, प्रशांत झंवर, राकेश फुलपगार, आबा माळी, बळीराम सपकाळे, शिवाजी पाटील, सादिक देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.