कोरोना अर्थात कोविड – १९ या भयावह अशा साथरोगाशी लढत असतांना आपल्या सगळ्यांच्या शब्दकोशात अचानक एक नवीन शब्द रूजू झाला. तो म्हणजे “सोशल डिस्टसिंग” (Social Distancing) अर्थात “सामाजिक अंतर”! काही विचारवंतांच्या व भाषातज्ज्ञांच्या मते “सामाजिक अंतर” हा शब्द या ठीकाणी वापरणे चुकीचे असून “शारिरीक अंतर” हा शब्द अचूक आहे. कारण “सामाजिक अंतर” ही संज्ञा विषमता वाढविणारी व पूर्वीच्या अस्पृश्यतेच्या परंपरेशी जुळलेली आहे. सामाजिक की शारिरीक अंतर या वादात न पडता, कोरोनाशी आगामी काळात लढतांना अंतर ठेवणे महत्त्वाचे आहे, हे नक्की!
तसे पाहिले तर पूर्वीपासूनच आपल्या दैनंदिन आयुष्यात अंतर ठेवणे हा एक भागच आहे. रस्त्यावर वाहन चालवतांना आपण “सुरक्षित अंतर ठेवा”, अशी सूचना वाचतो व त्याचे पालनही करतो. कुटूंब नियोजनातही ‘अंतर’ ठेवावेच लागले. एवढेच नव्हे तर आपल्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये पण ‘अंतर’ असतंच. अन् ज्या वेळेस हे अंतर फार कमी होते त्यावेळेस धाप लागल्याशिवाय राहत नाही. लिहीतांना, बोलतांना, गातांना, भाषणामध्ये सर्वच ठीकाणी शब्दातल्या अंतराला खूप महत्त्व आहे. विश्वचषक जर दरवर्षी आयोजित केला गेला तर त्यातील मज्जाच निघून जाईल. ४ वर्ष एवढे अंतर ठेवले म्हणूनच त्याची रंगत वाढत असते.
इतर अभिनेत्यांपेक्षा आमिर खान, ऋतीक रोशन, शाहरूख खान वर्षातून एखादाच सिनेमा करतात म्हणूनच सिनेप्रेमी त्यांच्या सिनेमाची वाट पाहत असतात, कारण आहे ‘अंतर…’ आजच्या तरुणाईच्या भाषेत सांगायचे तर इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप यावर नियम असल्यासारखे उगाच रोज सकाळ, संध्याकाळ पोस्ट टाकाल तर लाईक व कमेंट करण्याची संख्या नक्कीच कमी होईल. एकंदरीत अंतर हा आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. पण या पुढील काळात मात्र “अंतर ठेवणे” त्याचबरोबर काही “गोष्टींना अंतर” देणे हेच फायदेशीर व आपल्या आरोग्यासाठी नव्हे तर जीवन-मृत्यू याच्याशी देखील निगडीत आहे.
का पाळावे शारिरीक / सामाजिक अंतर?
कोरोना विषाणू प्रामुख्याने खोकला, शिंकेच्या वेळी किंवा थुंकीतून उडणाऱ्या थेंबातून पसरतो. अशा थेंबातून ३ फूटापर्यंत हा विषाणू पोहोचू शकतो. त्यामुळे संसर्गाचा प्रादुर्भाव सार्वजनिक होऊ नये म्हणून ३ ते ५ फूट अंतर ठेवणे महत्त्वाचे आहे. कोरोना विषाणू कडक पृष्ठभागावर स्थिरावतो व तेथून मऊ पृष्ठभागाकडे आकर्षित होतो. म्हणजे तो हातावर पडला तर ओठ किंवा नाकाच्या मऊ मांसल भागाकडे आकृष्ठ होऊन घशापर्यंत जातो व फुफ्फुसाला इजा करून श्वसनक्रियेस त्रास देण्यास सुरूवात करतो.
कोरोनाच नव्हे तर छातीचा क्षयरोग स्वाईन फ्ल्यु (H1N1), न्यूमोनिया हे सर्व संसर्गजन्य आजार मनुष्याच्या श्वसनक्रियेशी संबंधित आहे. छातीचा क्षयरोग हा कोरोनापेक्षा भयंकर असा जीवघेणा रोग आहे. भारतात प्रत्येक तासाला ५० लोक छातीच्या क्षयरोगाने मृत्यूमुखी पडत आहेत. छातीच्या क्षयरोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा दर (मृत्यूदर – १७ टक्के) आहे तर कोरोनाचा मृत्यूदर फक्त ३ टक्के आहे. स्वाईन फ्ल्यु (H1N1) या संसर्गजन्य श्वसन विकाराचा मृत्यूदर २.६ टक्के आहे. याचाच अर्थ ज्या वेळी आपण कोरोनाशी लढतो आहे, त्याचवेळेस जर काही गोष्टींना अंतर दिले व सार्वजनिक ठीकाणी अंतर पाळले तर या व तत्सम अशा भयंकर संसर्गजन्य आजारांना रोखू शकतो.
गर्दीपेक्षा अंतर महत्त्वाचे…
भारतीय समाज हा उत्सवप्रिय व गर्दीप्रेमी आहे. राजकीय सभा, निरनिराळे उत्सव, धार्मिक मेळावे, सत्संग, राजकीय आंदोलने, स्पर्धा अशा गर्दीमय कार्यक्रमांत नागरिक सहभागी होत असतात. आगामी काही काळात या सर्व गर्दीच्या कार्यक्रमांना अंतर द्यावे लागणार आहे. लग्नसोहळे, अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी टाळावी लागणार आहे.
कोणकोणत्या सवयींना अंतर देण्याची गरज आहे?
– सार्वजनिक ठीकाणी जसे की, उपहारगृहे, रेल्वे स्थानक, बस स्टँड, शाळा, कॉलेजेस, ऑफीसेस वगैरे या परिसरात थुंकणे बंद करावयास हवे. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच “मीच माझा रक्षक” याप्रमाणे गैरकृत्य करणाऱ्यांना प्रतिबंध केला पाहिजे. तंबाखु, गुटखा सेवन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली गेली पाहिजे. अशा व्यसनाधिन नागरिकांपासून अंतर राखले पाहिजे.
– तोंडावर मास्क लावणे, वारंवार हात धुणे, याबरोबरच शेकहँड न करता भारतीय संस्कृतीला अनुसरून नमस्काराची सवय लावावयास हवी. शेकहँड व आलिंगनाच्या भेटीच्या पद्धतीस अंतर दिले पाहिजे.
– खोकण्याच्या व शिंकण्याचे शास्त्रीय मॅनर शिकून घेऊन परंपरागत खुलेपणाने खोकल्याच्या व शिंकण्याच्या सवयीस अंतर दिले पाहिजे.
कशास काही नियम नुरला, कोण रोगी कोठे थुंकला । कोठे जेवला, संसगी आला, गोंधळ झाला सर्वत्र । त्याने रोगप्रचार झाला, लागट रोग वाढतची गेला । बळी घेतले हजारो लोकांला, वाढोनी साथ ।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५०च्या दशकात ग्रामगीतेद्वारे सार्वजनिक ठीकाणी बेछुट थुंकण्याच्या सवयीबद्दल व त्याद्वारे पसरणाऱ्या साथरोगाची वाढत्या संसर्गाची भिती कशी भयावह असते हे ग्रामीण व साध्या भाषेतून समजून सांगण्याचे कार्य केले होते. आज ३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती. राष्ट्रसंतांना विनम्र अभिवादन करतांनाच स्वच्छतेचे नियम पाळून, गर्दीपेक्षा अंतराचे महत्व जाणून घेऊ या! कोरोनाशी लढू या । अंतर देऊ या । अंतर पाळू या ।