चाळीसगाव – उंबरखेडचे सुपुत्र आणि आपल्या आगळ्या वेगळ्या समाजसेवेच्या धडपडीने खान्देश ,राज्य, देशात तसेच परदेशात देखील पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्न करणारे स्व. रामभाऊ शिरोडे यांचा “रामसेतू” पुस्तकरुपी जीवन प्रवास जगासमोर यावा यासाठी माझ्या स्व- खर्चातून ही पुस्तिका डिजिटल करून त्यांचा विचारांचा अनमोल ठेवा जतन करू असे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले.
चाळीसगावचे भूमिपुत्र स्व. रामभाऊ शिरोडे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचा कार्यपुस्तिकेचे प्रकाशन रविवारी सकाळी अकरा वाजता वाणी समाज मंगल कार्यालयात खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, स्वाध्याय परिवाराचे मुंबई येथील चंद्रकांत कुडतरकर तसेच अन्वेकरसाहेब, रावी संचालक डॉ. विनायक बापू चव्हाण, कलंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ. सुनीलदादा राजपूत, वाणी समाज अध्यक्ष शरद मोराणकर,अरुण आबा शिरोडे, विनायक चिंचोरे सटाणेकर, स्व. रामभाऊ शिरोडे यांच्या पत्नी श्रीमती अनुसया काकू शिरोडे, विनय शिरोडे, अविनाश शिरोडे या यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान समजावून घेवून त्यांचा कृतीयुक्त अभ्यास करणेसाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. पोलिओ निर्मूलनासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. राज्यातच नव्हे तर देशात तसेच पाकिस्तानात जाऊन पोलिओ च्या समूळ उच्चाटनासाठी शर्थीचे प्रयत्न केले. नवतरुणांच्या पाठीशी राहण्याची भूमिका त्यांनी आयुष्य भर जपली. मला देखील त्यांच्या सॊबत काम करण्याचा योग आला. माझ्यासारख्या तरुण अभियंत्याला केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सॊबत डेक्कन शुगर इन्स्टिट्युट मध्ये काम करण्याची संधी त्यांनी मिळवून दिली. वयाच्या८६वर्षाचे असतांना देखील त्यांची समाज सेवेची उर्मी आम्हासाठी प्रेरणादायी होती. त्यांचा मिळालेला आशीर्वाद ,दिलेले संस्कार पुढच्या पिढीसमोर कायम राहवे यासाठी उमंग व्याख्यानमालेतील एक पुष्प त्यांना समर्पित करतो अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली.














