नाशिक/ श्रीरामपूर – राष्ट्रवादीचे दिवंगत माजी मंत्री गोविंदराव आदिक यांचा मुलगा व राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी अविनाश आदिक यांच्या वाहनातून नाशिकमधील देवळाली मतदारसंघाच्या हद्दीत शिंदे गावाच्या परिसरात भरारी पथकांनी 4 लाख 58 हजार रुपये जप्त केले. ही रक्कम रात्री दीड वाजता कोषागारात जमा केली. तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथे 2 लाख 2 हजाराची रक्कम जप्त करण्यात आली. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी ही कारवाई झाल्याने राजकीय पक्षांनी चांगलाच धसका घेतला आहे.
निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास शिंदे गाव येथील निवडणूक विभागाच्या पथकास वाहनांची तपासणी करताना एमएच 17 सीडी 3149 या गाडीत अविनाश आदिक यांच्याकडे 4 लाख 58 हजार रुपयांची रक्कम आढळली. ही रक्कम भरारी पथकाने तत्काळ जप्त केली. पथकाचे प्रमुख मच्छिंद्र कांकणे यांनी रात्री दीडच्या सुमारास रक्कम कोषागारात जमा केली.
दुसर्या घटनेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली चेकपोस्टवर असलेली स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने 2 लाख 2 हजार 640 रुपयांची रक्कम जप्त केली. त्याचा पंचनामा करून ही रक्कम त्र्यंबकेश्वरच्या उपकोषागार अधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात 62 विविध पथके 15 मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याकडे व्हिडिओग्राफरही आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील बारीकसारीक गोष्टींवर निवडणूक विभाग, पोलिस आणि आयकर विभाग लक्ष ठेवून असल्याचेही निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.