जळगाव – कोकण ते गोवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात येत्या ४८ तासांत बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते असं हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.दरम्यान मुंबई – कोकण परिसरातील मुसळधार पाऊस सुरु असून शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेणे बाबत आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने कोकणात अतिवृष्टी, तर कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’, तर पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देखील जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या तारखेला मान्सून परतणार
यंदा भारतातील मान्सूनचा कालावधी संपला असून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातून मान्सून परतला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमधील विविध भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु आहे. राज्यातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिलेली आहे.















