जळगाव – राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन महासंमेलन 2020, ऑनलाईन पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2020 रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळा झूम अँपवर शानदार संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या 71 मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यातच सर्व मानकऱ्यांना इ-मानपत्रे त्यांच्या व्हाट्सअपवर देण्यात आली. सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प श्री. केशव जी महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या बीजभाषणात त्यांनी पुरस्कार मानकरी गुणवंतांनी पुरस्काराच्या प्रेरणेतून आपले भारत राष्ट्र अधिक शक्तिशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन केले. दुर्जन शक्तीच्या वाढत्या प्रादुर्भावाला जर पराभूत करायचे असेल तर तुमच्यासारख्या गुणवंतांच्या सज्जन शक्तीचे संघटन देशात निर्माण व्हायला हवे; असेही प्रतिपादन त्यांनी केले. ज्येष्ठ समाजसेवक श्री. अशोकानंद जी जवळगावकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. सदानंद खोपकर, सुप्रसिद्ध आदर्श शिक्षिका श्रीमती मनिषा कदम घार्गे मॅडम, श्रीमती रोशनी शिंदे मॅडम, श्रीमती कल्पिता पर्शराम तसेच धडाडीच्या डॅशिंग आयकर अधिकारी श्रीमती अरुणा परब यांनी या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थिती नोंदविली आणि व्हिडिओद्वारे आपले शुभ संदेश दिले. या राज्यस्तरीय ऑनलाईन समारंभाचे अतिशय उत्तम व्यवस्थापन श्री. राजेंद्रदादा सरोदे यांनी पाहिले. या ऑनलाईन समारंभाचे सूत्रसंचालन गुणिजन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट श्री. कृष्णाजी जगदाळे यांनी केले. यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात ऑनलाईन मानकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. खरा तो एकचि धर्म, इतनी शक्ती हमे देना दाता, हम होंगे कामयाब, ये देश है वीर जवानो का…. या गीतांचे गुणिजनांनी केलेले गायन-सादरीकरण लक्षवेधी ठरले. संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट श्री. कृष्णाजी जगदाळे यांनी उपस्थितांना ऑनलाईन ग्लोबल गुणिजन शपथ प्रदान केली आणि गुणिजन संसदेत पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. हजारो टाळ्यांच्या साक्षीने हा ठराव मंजूर झाल्याचे त्यांनी जाहीर केले. सोहळ्याच्या समारोपात तमाम महिला वर्गाने राष्ट्रवंदना सादर करून उत्साहात समारंभाची सांगता केली.















