नवी दिल्ली – सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरुन हिंसाचार करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करु नका अशी विनंती केली आहे. आंदोलकांना माझी विनंती आहे आणि सांगायचं आहे की, जर चांगले रस्ते, सुविधा आणि सांडपाण्याची योग्य व्यवस्था हा नागरिकाचा हक्क आहे तर त्यांची योग्य काळजी घेणं आपलीही जबाबदारी आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लखनऊत अटलबिहारी वाजपेयी मेडिकल युनिव्हर्सिटीचं भुमीपूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारावर भाष्य केलं.
“आंदोलन करताना हिंसाचार करणाऱ्या प्रत्येकाने आणि ज्याने सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं आहे त्यांनी आपण केलं ते योग्य होतं का असं स्वत:ला विचारायला हवं,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशातील तरुण आणि प्रत्येक नागरिकाला आपण आपली जबाबदारी काय आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी विनंती केली. “आपण स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाकडे वाटचाल करत असून आता आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत हे ओळखण्याची वेळ आली आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.















