पाचोरा – महाराष्ट्रात नागरीकरण झपाट्याने होत असून, त्यासोबत नागरीकरणाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण होत आहे. या प्रश्नांचे यशस्वीपणे निराकरण करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर मुख्याधिकारी संवर्ग करत आहे. पुढील काळ प्रशासनामध्ये नागरीकरणाचा राहणार असून प्रशासकीय स्तरावर मुख्याधिकारी संवर्गाला सक्षम करणे, संवर्गाचे प्रश्न सोडविणे यासाठी राज्यस्तरावर मुख्याधिकारी संवर्गाची महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना, मुंबई या नावाने राज्यस्तरीय संघटन असून दर तीन वर्षांनी या संघटनेची कार्यकारणी गठित करण्यात येते.
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे संघटनेची आभासी सर्वसाधारण सभा घेण्यात आली व त्या सभेमध्ये राज्यातील सर्व मुख्याधिकारी संवर्गाचे अधिकारी सामील होऊन पुढील तीन वर्षासाठी संघटनेची कार्यकारणी गठित केली.
सदर महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना कार्यकारीणीत अध्यक्षपदी ठाणे मनपा आयुक्त गणेश देशमुख, उपाध्यक्षपदी रामदास पाटील मुख्याधिकारी हिंगोली, सरचिटणीसपदी प्रशांत रसाळे मुख्याधिकारी अंबरनाथ, कोषाध्यक्षपदी जमीर लेंगरकर, नाशिक विभागीय संघटकपदी शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी न.पा.पाचोरा यांचा समावेश करण्यात आलेला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.















