बंगळुरु- कर्नाटकात मोठी उलथापालथ झाल्यानंतर भाजपचं सरकार स्थापन झालं. आता अपात्र ठरलेले आमदार नारायण गौडा यांनी एक मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पां यांनी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये दिले, त्यांना फक्त ७०० कोटी रुपये मागितले होते, असा दावा या आमदाराने केला. हे पैसे विकासकामासाठीच खर्च झाले असल्याचंही गौडा यांनी स्पष्ट केलं.
समर्थकांशी बातचीत करताना नारायण गौडा म्हणाले, “एक जण पहाटे ५ वाजता (कुमारस्वामी सरकार पडण्यापूर्वी) माझ्याकडे आला आणि येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी नेलं. जेव्हा आम्ही येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी दाखल झालो, तेव्हा ते देवपूजा करत होते. मी आत गेल्यानंतर त्यांनी बसायला सांगितलं. मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा, असं आवाहन येडियुरप्पांनी केलं.
यासोबतच गौडा म्हणाले की, “मी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी ७०० कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती केली. त्यांनी (येडियुरप्पा) ३०० कोटी रुपये जास्त देण्याचं आश्वासन दिलं. यानंतर त्यांनी तो निधी मंजूरही केला. अशा चांगल्या माणसाला आपण समर्थन देऊ नये का? मी याच कारणांमुळे पाठिंबा दिला. अपात्र ठरलेल्या आमदारांशी माझा काहीही संबंध नसल्याचंही येडियुरप्पांनी यानंतर सांगितलं.
कर्नाटकात मोठी उलथापालथ झाल्यानंतर भाजपने सरकार स्थापन केलं होतं. यापूर्वी मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे एचडी कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं. बंडखोरी करणाऱ्या १७ आमदारांना अपात्रही ठरवण्यात आलं होतं.















