जळगाव, ता. ४ : ज्या वेळी देशात 50 टक्के महिला उद्योजक होतील तेव्हा भारत हा जगात क्रमांक एकचा देश बनेल. आजच्या महिला या स्वयंपूर्ण आहेत. त्यामुळेच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणेही तितकेच गरजेचे आहे. महिलांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्याची गरज असून यासाठी घरातल्या प्रत्येक पुरुषाने पुढाकार घेण्याची गरज आहे. महिलांना उद्योग क्षेत्रांत ताकदीची नव्हे, तर फक्त इतरांच्या विश्वासाची गरज आहे असा सूर रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय व एशियन इस्टीट्यूट ऑफ फॅमिली मॅनेज बिजनेस मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या “ग्रुमिंग डॉटर फॉर इंटर्नशिप” या वेबिनारमधील मार्गदर्शकामधून निघाला. या ऑनलाईन वेबिनार मार्गदर्शनात रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ऑलीव इनकॉर्पोरेशन मुंबई च्या संचालिका दिशा दौशी-शहा, सितारा शिपिंग लिमिटेड मुंबईच्या संचालिका संजम सही गुप्ता, युनायटेड ब्रदर्स गुडगाव चे व्यवस्थापकीय संचालक मिनाक्षी शर्मा, प्रेनया इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. ली. बंगलोर च्या संचालिका प्रिया पिल्ले व एस.पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेट मुंबई येथील प्रा. समिश दलाल हे उपस्थित होते. सदर वेबिनारच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी महिलानो जागे व्हा. कुटुंब संस्थेच्या जातीच्या व धर्माच्या नावाखाली मुळीच जगू नका. स्वत:च कर्तुत्व दाखवा. आज महिलांना करण्यासारख्या अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. अंगावर काही तोळे दागिने घालून शोभेची वस्तू होण्यापेक्षा, स्वता: च्या हिमतीवर कमवणारी उद्योगिनी व्हा व आपल्या भागातील महिलानीही पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी करत केले. तसेच ऑलीव इनकॉर्पोरेशन मुंबई च्या संचालिका दिशा दौशी-शहा यांनी सध्याच्या औद्योगिक क्षेत्रातील अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत व अस्पष्टतेच्या काळात महिलांनी स्वतःचे करिअर सुरक्षित करण्यासाठी स्वतःला कायम अद्ययावत ठेवणे गरजेचे असून आपल्यातील ज्ञान, कौशल्य व अनुभव वाढवतानाच आपला दृष्टीकोन हा कायम सकारात्मक व सर्वसमावेशक कसा राहील याकडे लक्ष द्यायला हवे असे सांगितले. तसेच सितारा शिपिंग लिमिटेड मुंबईच्या संचालिका संजम सही गुप्ता यांनी स्त्रियांचा सामाजिक व सांस्कृतिक दर्जा उंचावण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य व त्याला पुरेसे संरक्षण ही किमान आवश्यक बाब आहे. केवळ कायदे करून, त्याची माहिती देऊन, स्त्रियांवरील अन्याय कमी होईल व स्त्रीचा दर्जा उंचावेल ही समजूत चुकीची आहे. समाजात स्त्रीविषयक दृष्टिकोन सकारात्मक झाला, तर खर्या अर्थाने स्त्री यशस्वी उद्योजक होईल असे नमूद केले. युनायटेड ब्रदर्स गुडगाव चे व्यवस्थापकीय संचालक मिनाक्षी शर्मा यांनी एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उद्योगधंद्यांमध्ये स्त्रियांचा वाटा अत्यंत अल्प होता तथापि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी स्त्रियांचा औद्योगिक क्षेत्रातील सहभाग अत्यंत वेगाने वाढल्याचे दिसते. सध्या सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करीत असून औद्योगिक क्षेत्रातही त्या मागे नाहीत. भारताच्या तुलनेत यूरोपीय राष्ट्रे, अमेरिका, जपान, कोरिया, कॅनडा या पुढारलेल्या व प्रगत राष्ट्रांतील महिला औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. तेथील अर्थव्यवस्था, सामाजिक परिस्थिती, पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा व वागणूक, शिक्षणाची संधी आदी अनेक घटक त्यास कारणीभूत आहेत. त्याचेच अनुकरण आपल्या भारतीयांनी करायला हवे व महिलांसाठी उद्योगाचे अनेक दारे खुले करायला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच प्रेनया इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. ली. बंगलोर च्या संचालिका प्रिया पिल्ले यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असलेले अनेक गुण स्त्रियांमध्ये उपजतच असतात. नैसर्गिक क्षमता, शांत व सहनशील स्वभाव, तणाव व संकटे हाताळण्याची कसोशी, सत्तेमध्ये इतरांना सहभागी करून घेण्याची क्षमता अशा गुणवैशिष्ट्यांमुळे त्या त्यांचे कार्य कार्यक्षमतेने करू शकतात. समाजाचा स्त्रियांबाबतचा जो पारंपरिक दृष्टिकोण होता, त्यामध्ये आता झपाट्याने बदल घडून येत आहे. शिक्षणाचा प्रसार व स्त्रीशिक्षणाला दिले जाणारे प्राधान्य, उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या सोयी, नागरीकरण व स्वयंरोजगाराच्या संधीत होणारी वाढ ह्या सामाजिक घटकांत होणारे बदलही त्यासाठी पोषक ठरत आहेत आणि येणाऱ्या काळात महिला उद्योग क्षेत्रात नक्कीच आपले पाय घट्ट रोवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सदर वेबिनार मध्ये नवउद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व अनेक विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. सदर कार्यक्रमाचे समन्वय प्रा. तन्मय भाले यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी यांनी अभिनंदन केले.
















