मुंबई- महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील सर्वात अनुभवी व दिग्गज नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला म्हणूनच महाविकास आघाडी आकाराला आली, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. ‘राऊतांनी १७० हा आकडा कुठून आणला हे त्यांनाच विचारा’ असे पवार गमतीने सांगायचे पण हे गणित ते आणि मी मिळून एकत्रच करत होतो, अशी आतली माहितीही राऊत यांनी दिली. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याने शिवतीर्थावर शपथ घ्यावी अशी आम्हा सर्वांची इच्छा असून तसेच होईल, अशी आशाही राऊत यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडी आजच आपला नेता निवडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. हा दावा शिवसेना करेल व त्यास राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचं समर्थन असेल. हा दावा स्वीकारून राज्यपाल आम्हाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देतील. त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल. हे सरकार पूर्ण बहुमतातलं असेल. १७० हे संख्याबळ आमच्या आघाडीकडे आहे आणि तो आकडा तुम्हाला विश्वासदर्शक ठरावावेळी दिसेल’, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावे, ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील, यात कोणतंही दुमत नाही. उद्धव यांनीच पाच वर्षे मुख्यमंत्री राहावं, अशी खुद्द शरद पवार यांची इच्छा आहे, असेही राऊत यांनी पुढे नमूद केले.
महाविकास आघाडीचं सरकार हे तीन चाकांचं सरकार असेल. ते कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्याबाबत विचारले असता अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार तर ३५ चाकांचं होतं. मात्र कोणतीही आडकाठी न येता ते सरकार पाच वर्षे चालले. त्याचमुळे आमची तीन चाकांची रिक्षा असली तरी यात सगळे अनुभवी नेते आहेत. कोणताही वैयक्तिक स्वार्थ न पाहता महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. आम्ही वेगळ्या विचारांचे पक्ष असलो तरी आमच्यात पद व सत्तावाटपावरून कोणतेच मतभेद नाहीत. भाजप आणि शिवसेनेतील संबंधांमध्ये जितकी सहजता नव्हती तितकी सहजता आमच्यात निर्माण झाली आहे, असा दावा राऊत यांनी केला. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता, असे आजही फडणवीस म्हणत असले तरी आता त्यांनी इतकंच लक्षात घ्यावं की, तुम्ही जे ठरलंच नव्हतं असं सांगत सुटला होतात ते अखेर शिवसेनेने मिळवलं आहे. मुख्यमंत्रिपद आमच्याकडे आले आहे, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला.















