मुंबई: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाविकासआघाडीचे सरकार म्हणजे विनाचालकाची गाडी आहे. त्यामुळे कधीही अपघात होण्याचा धोका आहे. हे सरकार अत्यंत उदासीन आणि कृतीशून्य आहे. सरकार सहाच काय बाराही महिने झोपून असते. यांच्याकडे बघून कुंभकर्णही म्हणेल की, रिश्ते मै ये हमारा बाप लगते है, अशी टीकामुनगंटीवार यांनी केली.
विदर्भ, मराठवाड्याची वाट लावण्याचे ठरवलेय?
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा विदर्भ आणि मराठवाड्यावर राग आहे. कारण विदर्भ आणि महाराष्ट्रातील जनता ही नेहमी भाजप किंवा काँग्रेसच्या पारड्यात मत टाकते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विदर्भ, मराठवाड्याची वाट लावण्याचे ठरवले आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सरकारने आमच्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सरकारने याविषयी विरोधकांशी बोलायला पाहिजे होते. भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द झाल्याशिवाय आम्ही ही निवडणूक होऊ देणार नाही. सरकार याबाबत अधिकृतरित्या आमच्याशी चर्चा करेल तेव्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार उतरवयाचा की नाही, याचा निर्णय भाजपकडून घेतला जाईल. सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचीही मागणी केली होती, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.