नागपूर- महाराष्ट्रातही आंध्र प्रदेशप्रमाणे कठोर कायदा करून बलात्कार प्रकरणातील दोषीला १०० दिवसांत फाशी दिली जावी, असा प्रस्ताव शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडला असून त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांकडून यासंदर्भात अहवाल मागितला आहे.
आंध्र प्रदेश विधानसभेत ‘दिशा विधेयक २०१९’ मंजूर करण्यात आले असून दिशा कायद्याने महिला सुरक्षेला बळ मिळणार आहे. या कायद्यानुसार बलात्कार प्रकरणातील दोषीला २१ दिवसांत फाशी दिली जाणार आहे. त्याचा दाखला देत महाराष्ट्रातही असा कठोर कायदा करण्यात यावा, अशी विनंती सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करण्यासाठी आंध्र प्रदेशमधील या विधेयकाचा मसुदा मागवून घेण्यात यावा व त्यात गरज असल्यास आवश्यक असे फेरफार करून हे विधेयक हिवाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्यात यावे, असेही सरनाईक यांनी पुढे नमूद केले आहे. देशातील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आंध्र प्रदेशसारखा कठोर कायदा सर्वच राज्यांत व्हायला हवा, अशी माझी अपेक्षा असून याच अधिवेशनात यासंबंधी विधेयक मंजूर केल्यास महाराष्ट्र हे महिला सुरक्षेबाबत कठोर कायदा करणारे दुसरे राज्य ठरेल, असे सरनाईक यांनी सांगितले.















