गाळेधारकांनी केली दंड कमी करण्याची मागणी
जळगाव – शहरातील फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील शेकडो गाळेधारक शुक्रवारी महानगरपालिकेत धडकले. यावेळी गाळेधारकांनी महापालिका इमारत गजबजून गेली होती. गाळेधारक समितीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्यासह गाळेधारकांनी यावेळी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची भेट घेतली. या भेटीत समाधान न झाल्याने गाळेधारकांनी दुसऱ्या मजल्यावरील उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांना गराडा घातला. यावेळी दुसऱ्या मजल्यावर चालायलाही जागा नव्हती.
बिले नुकसान भरपाई जाचक व घातक- गाळेधारक
महापालिकेद्वारे गाळेधारकांना दिलेली बिले जाचक व घातक आहे. बिले कमी करुन देण्याची मागणी यावेळी गाळेधारक समितीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्यासह गाळेधारकांच्या प्रतिनिधींनी आयुक्त डॉ. टेकाळे यांच्याकडे केली. उत्पन्न कमी असून महापालिकेने आकारलेली बिले अवाजवी आहेत. महापालिकेने हेतुपुरस्कर दंड आकारला असून बिलांवर आकारलेली शास्ती कमी करावी तसेच एकपट दंड भरण्यास गाळेधारक तयार आहेत, अशी भूमिका मांडली.
बाकी भरावीच लागणार – आयुक्त
मनपा प्रशासनाने गेल्या सात वर्षांचे एकत्रित भाडे आकारले आहे.गाळेधारकांना सुधारित बिलांमध्ये निम्म्याने रक्कमा कमी केल्या आहेत. घसारा त्यातून वगळला आहे. यापेक्षा बिले कमी होणार नाहीत. बिले कमी करण्यासंदर्भात महासभेत तसा प्रस्ताव पारीत करुन द्यावा, असे आयुक्तांनी समितीला सांगितले आहे.
ना. गिरीश महाजन यांना भेटणार- डॉ. शांताराम सोनवणे
गाळेसंदर्भातील मनपाचा जीआर घातक आहे. जीआर विरोधात उच्च न्यायालयात रीट पिटीशन दाखल करु. आ. राजुमामा भोळे यांनी आपल्या जाहीरनाम्यात गाळेप्रश्न मिटवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आजपर्यंत त्यावर काहीही निर्णय होवू शकलेला नाही. यासंदभार्त आ. राजुमामा भोळे यांची भेट घेणार आहोत. त्याचप्रमाणे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांची शुक्रवारी संध्याकाळी भेट घेणार असून त्यानंतरच पुढील भूमिका ठरवू अशी प्रतिक्रिया डॉ. शांताराम सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली .