भुसावळ- (परशुराम बोंडे ) आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव भुसावळ विधानसभा मतदारसंघातून नशिराबाद येथील मूळ रहिवासी व जळगाव पंचायत समितीच्या सभापती यमुनाबाई दगडू रोटे ह्या निवडणूक लढवणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
तत्कालीन कै.खा.वाय.जी महाजन व मा.आ.दिलीप भोळे यांना नशिराबाद गाव भुसावळ विधानसभा मतदार संघात असताना रोटे परिवाराने सेना-भाजपा युतीसाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून रोटे परिवार भाजपाशी एकनिष्ठ आहे. यमुनाबाई रोटे ह्यापूर्वी नशिराबाद ग्रामपंचायतीच्या सदस्या होत्या व गेल्या वर्षी त्यांची पंचायत समिती सभापतीपदी निवड झाली होती. भुसावळ विधानसभा मतदारसंघात लेवा समाजाची संख्या सर्वाधिक असून त्यांच्यासह सर्व समाजातील नागरिकांची रोटे परिवाराचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.नशिराबाद येथील दगडू रोटे लेवा समाजाचे असले तरी त्यांच्या पत्नी यमुनाबाई ह्या या गावातीलच रहिवासी असून अनुसूचित जातीतून आहे.भाजपातर्फे यमुनाबाई रोटे यांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघावर दावेदारी केली असून भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजीव पाटील व किशोर काळकर यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे भुसावळचे राजकीय समीकरण बिघडण्याचे चिन्हे दिसत आहे.