जळगाव दि. २१ (प्रतिनिधी)- प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला आज छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. यातून प्रभू श्रीराम यांच्या चरणी संगीत नृत्याची सेवा अर्पण केली. अयोध्यातील रामजन्माचा क्षण.. गौतम आश्रम सीता स्वयंवर, अयोध्यामध्ये राज्यभिषेक सोहळ्याची तयारी..मंथरेचा कैकैला कानमंत्र.. राजा दशरथाला कैकैने स्मरण करून दिलेले दोन वचने.. जिथे राघव तिथे सिता म्हणत श्रीराम, लक्ष्मण, जानकीचा वनवास.. सहस्त्र चौदा राक्षस वध.. रावणाकडून सीता हरण.. सीता शोधार्थ असताना जटायू भेट.. शबरी भेट.. सीता हनुमान संवाद.. रामसेतू निर्माण.. रावणाचा वध असा एक एक क्षण रसिक श्रोत्यांना रामभक्तीची अनुभूती करून देत होता.
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजीत व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजीत ‘अवधेय… एक आदर्श’ चे सादरीकरण प्रभाकर संगीत कला अकादमीच्या कलावंतांनी केले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. याप्रसंगी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, कांताई नेत्रालयाच्या डाॕ. भावना जैन, प्रभाकर अकादमीच्या डॉ. अपर्णा भट, चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन उपस्थित होते. गुरुवंदना दीपक चांदोरकर यांनी सादर केली. आभार दिपीका खैसाल यांनी मानले.
डाॕ. भावना जैन यांच्या हस्ते प्रभाकर अकादमीचा डाॕ. अर्पणा भट यांचा सत्कार करण्यात आला.
अयोध्यानगरीत प्रभू रामचंद्र यांच्या जन्माविषयी राम जन्मला ग सखे राम जन्मला.. राम चरण तुझे लागले आज मी शाप मुक्त झाले.. आकाशी जडले नाते धरणी मातेशी स्वयंवर झाले सीतेचे.. मोडू नका वचनास नाथा.. राम चालले थांब सुनंदा थांबवी रे रथ.. दैव्य ज्यात दुःखे भरता पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा दोष नही कुणाचा.. कोण तु कुठला राज कुमार.. सूड घे त्याचा लंका पती.. मज आणून द्या हरिण आयोध्या नाथा..थांबू नको दारात याचका.. मरणोमुख त्याला मारसी पुन्हा रघुनाथा..धन्य मी शबरी लागली श्री चरणे आश्रमा..लिलिया उडणी गगना पेटवी लंका हनुमंत.. सेतू बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय..युध्द हे राम रावणाचे.. रावण वध झाला.. त्रिवार जय जय कार रामा..
गीते सादर करून कथन नृत्यशैलीतुन रामायण रसिकांसमोर सादर केले. प्रभाकर संगीत अकादमीच्या २० कलावंतांनी हे सादरणीकरण केले. ती कवी ग.दि.मा. यांच्या समृद्ध लेखणीतून निर्माण झालेले गीत रामायण आणि त्या गीतांना स्वरसाज चढवला तो प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी, या दोघांनी अजरामर केलेल्या गीतांचे नृत्य दिग्दर्शन करून ‘अवधेय… एक आदर्श’ सादरीकरण केले. प्रभाकर संगीत अकादमीच्या डॉ. अर्पणा भट यांनी नृत्यसंरचना दिग्दर्शित केल्या. या कार्यक्रमाची प्रकाश योजना रंगकर्मी योगेश शुक्ल, हर्षल पवार यांनी सांभाळली.
















