पाचोरा : भारतीय जनता पार्टी तर्फे देण्यात आलेल्या जन आक्रोश निवेदनातील प्रत्येक मागणी ही गावागावातील आणि घराघरातील शेत शिवारातील शेतकऱ्यांची ज्वलंत मागणी असून त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शविला आहे. या मागण्यांसाठी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता जनतेला न्याय द्यावा अशी आमची रास्त भूमिका आहे. परंतु आमदार किशोर धनसिंग पाटील यांनी समस्या सोडवण्यासंदर्भात कुठलीही सहानुभूती न दाखवता अथवा शेतकऱ्यांना कुठलाही धीर न देता समस्यांचे फक्त राजकारण करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. या निवेदनातील शेतकर्यांच्या वेदना समजून न घेता उलट त्यावर राजकीय मीठ चोळून आमदाराने येथील शेतकऱ्याला प्रताडीत केले आहे. यातून या स्थानिक आमदाराचा नाकर्तेपणा जगासमोर आला आहे.असा घणाघात भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केला आहे.
दिनांक ८ रोजी पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या माध्यमातून 20 हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचे जनआक्रोश निवेदन खासदार उन्मेषदादा पाटील व आमदार राजुमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आले होते. आमदार किशोर धनसिंग पाटील यांनी या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार न करता आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जनआक्रोश निवेदनाला वेगळीच दिशा देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.अनेक दिवसांपासून समस्यांमध्ये होरपळलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने म्हणून शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या जिल्ह्याचे पालकत्व असलेल्या मा.जिल्हाधिकारी या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्याचा व विधायक मार्गाने सर्व समस्या सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. असे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले.
तसेच आमदार महोदय म्हणतात की C.C.I. ही केंद्राची एजन्सी आहे.त्यात खासदार उन्मेष पाटील यांनी लक्ष घालावे . परंतु आमदारांचा अभ्यास कमी असावा, पाचोरा- भडगाव मधून आता पर्यंत बाजार समितीच्या माध्यमातून भारतीय कपास निगम (C.C.I.) कडून १० वर्षांतील सर्वांत उच्चांकी २ लाख क्विंटल कापूस खा. उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नाने व सभापती सतिष शिंदे यांच्या नेतृत्वात खरेदी केला गेला आहे. मात्र भडगाव तालुक्यात कापूस पणन महासंघ ही राज्य शासनाची संस्था असून तेथील कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आमदार असमर्थ ठरले आहेत.तसेच गेल्या एक महिन्यापासून ते फक्त सांगताहेत की जिनिंग मालकांची बैठक घेऊन मजुरांचा प्रश्न मार्गी लावेल परंतु आता पर्यंत प्रत्यक्ष कुठलीही कृती त्यांच्या कडून होताना दिसत नाहीये. तसेच मका,ज्वारी ह्या साठी खरेदी केंद्रावर त्यांनीच दिलेल्या माहिती नुसार पाचोऱ्यात मक्यासाठी १८५५ व ज्वारी साठी….आणि भडगावात मक्यासाठी २३०० आणि ज्वारी साठी ९०० इतक्या शेतकऱ्यांची नाव नोंदणी झालेली असून दिवसांला फक्त ५-५ वाहने शेतकऱ्यांची मोजली जात असून दोघे तालुक्यातील संपूर्ण मका व ज्वारी खरेदि साठी पुढचा रब्बी हंगाम उगवेल. तो पर्यंत शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारा पैसा कुठून उभा करावा ? यावर त्यांनी कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही. ,तसेच शेतकऱ्यांच्या दूध भाव वाढ संदर्भात दूध संघ आणि पीक कर्ज च्या बाबतीत जिल्हा बँक या विषयी बोलतांना ते म्हटले की दोघेही भारतीय जनता पार्टी च्या ताब्यात आहेत. पण त्या सांगू इच्छितो की, ह्या दोघेही संस्था सहकार क्षेत्रातील असून तेथील संचालक हे कुठल्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर नव्हे तर पॅनल मधून निवडून आलेले असतात. आणि त्या ठिकाणी तुम्ही संचालक आणि व्हा.चेअरमन आहात. तरी देखील तालुक्यातील समस्या मांडण्यात देखील आमदार असमर्थ(अकार्यक्षम) ठरले आहेत. त्यासोबतच एकूण ११ मागण्यांचे निवेदन आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने दिले असून आमदारांनी फक्त ४ मागण्यांवर बोलून त्याही फेटाळून लावल्या आहेत. असा बेजबाबदार पदाधिकारी यापूर्वी कधीही या मतदारसंघाला लाभला नाही. निदान मतदार संघाचा कुटुंबप्रमुख म्हणून आमदार जबाबदारी स्वीकारून समस्या सोडविण्यासाठी लायक नसतील तर शासन दरबारी जनतेचा आक्रोश पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी माझी होती आणि आहे. म्हणून जनतेच्या प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी माध्यम म्हणून लढण्यासाठी अहोरात्र तयार आहे. असे अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले.
तसेच आमदार किशोर धनसिंग पाटील यांना आमदार पदाच्या जबाबदारीची जाणीव नसेल तर त्यांनी पद सोडावे , अन्यथा जनतेचे प्रश्न सोडवावेत. आणि २०,००० शेतकऱ्यांच्या सह्यांचे जनआक्रोश निवेदन हे फक्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नसून माझ्यासह तालुक्यातील भाजपा च्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी गावागावांत जाऊन सर्वच समस्यांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या समजून घेऊन पाठिंब्यासंदर्भात शेतकऱ्याने स्वतःहून स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. असे यावेळी बोलतांना अमोल शिंदे यांनी सांगितले. तसेच हे आंदोलन हे केवळ प्रातिनिधिक स्वरूपात असून त्यापेक्षाही कितीतरी जास्त पटीने शेतकरी समस्याग्रस्त आहेत. अशा शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना आम्ही वाचा फोडली तर सदरचे प्रश्न म्हणजे खासदारांचे फालतू आरोप आहेत असा उथळ शब्दप्रयोग आमदारांनी केला. शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांचे निवेदन म्हणजे फालतू आरोप असल्याचे म्हणणारा निगरगठ्ठ आमदार या मतदारसंघाला लाभला ,हे या जनतेचे दुर्दैव आहे.असे अमोल शिंदे यांनी सांगितले
तसेच आमदारांमध्ये खरंच आमदारकीच्या पदाची आणि सत्तेची धमक असेल तर चोवीस तासात शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे आव्हानही अमोल शिंदे यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत अभ्यास न करता केवळ आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी करून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार बंद करावा. ही राजकारण करण्याची वेळ नसून शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, विजग्राहक यांना न्याय देण्याची वेळ आहे. उठसुठ राजकारण करून मूळ प्रश्न व समस्यांना वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करू नये. निदान शेतकऱ्यांच्या भावनिक प्रश्नांबाबत तरी त्यांच्या वेदनांवर राजकीय मीठ चोळू नये. असे अमोल शिंदे यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील,बाजार समिती सभापती सतिष शिंदे,शहराध्यक्ष रमेश वाणी, मा.पं.स.सभापती बन्सीलाल पाटील,सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,दिपक माने,हेमंत चव्हाण,आदी उपस्थित होते.