पाचोरा,(किशोर रायसाकडा)- संपूर्ण देशात कोरोनाचे संकट असताना लॉक डाऊनच्या काळात सुद्धा चक्क मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर पोर्चमध्ये खुर्च्या टाकून मद्यप्राशन करणाऱ्या पाचोरा नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक धनराज नारायण पाटील यांना मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी निलंबित केले आहे तर धनराज पाटील यांचेसह एस टी सावळे,गौतम निकम या दोन्ही आरोपींना पाचोरा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली आहे.
22 एप्रिल रोजी आरोग्य निरीक्षक धनराज पाटील यांनी इतर दोन आरोपींसोबत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचे निवासस्थानासमोर मद्यप्राशन करून
असभ्य वर्तन केले होते म्हणून मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आज तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली असून मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी धनराज पाटील यांचे वर निलंबनाची कारवाई केली आहे. फिर्यादी शोभा बाविस्कर यांचे तर्फे ऍड शांतीलाल सैंदाणे यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे ऍड अंकुश कटारे यांनी काम पाहिले.