राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप – अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या बालमनांचे सादरीकरण
जळगाव – येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सुरु असलेल्या 17 व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा आज (दि.9) समारोप झाला. आज सादर झालेल्या 5 बालनाट्यांमधील 3 बालनाट्यांतून पालकांच्या अनावश्यक अपेक्षांचे ओझे आपल्या खांद्यावर ठेवून बालपण हरवत असल्याचे बालकलावंतांनी मांडले. या बालनाट्यांमधून त्यांनी मांडलेल्या विविध वास्तववादी मुद्द्यांमधून उपस्थित पालक प्रेक्षकांसमोर अनेक अनुत्तरीत प्रश्न उभे केले.
बालपण हरवलंय
डॉ.काकासाहेब पुर्णपात्रे माध्यमिक विद्यालय चाळीसगाव यांनी किरण लद्दे लिखीत, डॉ.हेमांगी पुर्णपात्रे दिग्दर्शित बालपण हरवलंय हे बालनाट्य सादर केले. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याने मेरिटमध्ये आले पाहिजे हा प्रत्येकाचा आग्रह असतो, पण त्यासाठी आपण त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांची गळचेपी तर करत नाही ना? आपल्या अवाजवी अहंकारामुळे आपण निष्पाप बालकांचे बालपण हिरावून तर घेत नाही ना? निराशेच्या अंधारात अडकलेली मुले या बालनाट्याच्या माध्यमातून आमचं बालपण आम्हाला परत द्या या उदासीनतेच्या अंधारातून आम्हाला बाहेर काढा असं आर्जव करत असतात. पण पालक मात्र आपल्या अनावश्यक अपेक्षांमुळे त्यांची ही विनंती निर्जीव दगडासारखी ऐकून घेतात, त्यांची मदत करत नाही. मुलाच्या जडणघडणीत लक्ष घाला पण त्यांच्यावर आपल्या अपेक्षा लादू नका असा संदेश देणार्या या बालनाट्यात अनुष्का महाजन, सुहास पाटील, दिव्या पाटील, आशिष निकम, अक्षया सोनवणे, वेदांत पाटील, करुणा पाटील, अंजली महाजन या बालकलावंतांनी अभिनय केला. तांत्रिक बाजू किरण लद्दे (प्रकाशयोजना), विक्रांत चांदणे (नेपथ्य), सुजित जाधव (पार्श्वसंगीत), स्नेहल लद्दे (वेशभूषा) यांनी सांभाळल्यात.
पडसाद
लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था धुळे यांनी धनंजय सरदेशपांडे लिखीत सुजय भालेराव दिग्दर्शित पडसाद हे बालनाट्य सादर केले. शहरी वातावरणात वाढलेली मुले निसर्गाच्या सान्निध्यात जातात. या नैसर्गिक वातावरणाने त्यांच्यातील जाणिवा व संवेदना कशा जागृत होणार्या या बालनाट्यात, ऋषी, दिव्या, रवी आणि आदित्य हे चार मित्र त्यांच्या जंगल्यातल्या मित्राला भीमाला भेटतात. त्यासाठी चालत जातांना त्यांना उलगडणारा निसर्ग, पशू, पक्षी यांच्याबद्दलची माहिती यातून नाट्य निर्माण होत जाते. या बालनाट्यात श्रेयस जोगी, वल्लभ ठाकूर, नारायणी सोनार, कार्तिकी ठाकूर, जगदीश वाघ, प्रणय कासार, सिध्देश बाविस्कर या बालकलावंतांनी अभिनय केला. तांत्रिक बाजू सुजय भालेराव (नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा), केतकी म्हस्कर (पार्श्वसंगीत), हितेश भामरे (वेशभूषा), चैतन्य जोग, सिध्दांत मंगळे, राहूल मंगळे, जयेश सूर्यवंशी, हर्षल मराठे (रंगमंच व्यवस्था) यांनी सांभाळली.
एप्रिल फुल
स्त्री शिक्षण संस्था, धुळे प्रकाश पारखी लिखीत, केदार नाईक दिग्दर्शित एप्रिल फुल हे बालनाट्य सादर केले. आजकाल शिक्षणाच्या मागे पळताना क्लास ट्यूशनच्या व्यापात मुलांना खेळायलाही वेळ मिळत नाही. पण 10 – 12 वर्षापूर्वी मुलं रविवारी हक्काने हवं तेवढं खेळायची. आईवडील घरी नसल्याची संधी साधून अश्विनी, नूतन, शिल्पा, सुनीता, अनिता या मुली नाटकाचा खेळ खेळतात. त्यांच्या या खेळात शैलेश, दिनेश, मंगेश, नचिकेत हे देखील सामील होतात. या खेळातील गंमती, जंमतीतून उलगडत जाणार्या या बालनाट्यात साहिल काळे, राज कुलकर्णी, राघवेंद्र कचवाह, वेदांत मोरे, प्रणाली कासार, ग्रीष्मा पाटील, पूजा पाठक, समीक्षा भडागे, गायत्री भांडारकर, वैष्णवी कुलकर्णी, पूजा विसपुते या बालकलावंतांनी अभिनय केला. तांत्रिक बाजू चैतन्य जोग (नेपथ्य), सुजय भालेराव (प्रकाशयोजना), जयेश सूर्यवंशी (पार्श्वसंगीत), केतकी म्हस्कर (रंगभूषा), सौ.नीता जोशी (वेशभूषा), सौ.शीतल भालेराव, सौ.शिल्पा म्हस्कर, दिलीप काळे (रंगमंच व्यवस्था) यांनी सांभाळल्यात.
धरती संग रंगबेरंगी
विवेकानंद विद्यामंदिर भुसावळ यांनी अमोल ठाकूर लिखीत दिशा ठाकूर दिग्दर्शित धरती संग रंगबेरंगी हे बालनाट्य सादर केले. इंद्रधनुष्यातील सात रंगांचे महात्म्य सांगणार्या या नाट्यात काळा आणि पांढरा रंग हे प्रमुख पात्र आहेत. इतर सातही रंग आपल्या रंगसौंदर्याच्या कौतुकात रममाण असता. पांढरा रंग त्यांच्यात येऊ पाहतो तेव्हा ते त्याला हाकलून लावतात. या रंगांना जेव्हा काळा रंग घाबरवतो तेव्हा मात्र पांढरा रंग या सगळ्या रंगांना वाचवतो, तरीही हे रंग त्याला आपल्यात सामावून घेत नाहीत. अखेरीस सूर्य येवून या सर्व रंगांचे रंग हिरवून घेतो आणि पांढरा रंगच सर्व रंगाचा जन्मदाता आहे हे स्पष्ट करून देतात. इतर रंगांना पांढर्याचे महत्व समजते व ते पांढरा रंगाला आपल्यात सामावून घेतात. अहंकार न बाळगता दुसर्याना आपल्यात सामावून घेऊन एकीने राहण्याचा संदेश देणार्या या बालनाट्यात प्रतिक्षा काळे, पूर्वा सपकाळे, याज्ञिका डवरे, ललित पांडव, रुचिता कोळी, शैलेश तायडे, दिव्या मावळे, वैभव ठाकूर, मुग्धा लोहार या बालकलावंतांनी भूमिका केल्यात. तांत्रिक बाजूत भाग्यश्री वाघ, साक्षी घ्यार, कुमुद महाजन, गौरव कोळी, हर्षल धनगर, प्रेरणा बोरवणकर, महेश पवार (रंगमंच व्यवस्था), दर्शन गुजराथी (पार्श्वसंगीत), करुणा साबळे (वेशभूषा), अमोल ठाकूर (प्रकाशयोजना), गायत्री परदेशी (नेपथ्य), सुमेध बागुल (रंगभूषा) यांनी सांभाळल्या.
अ..आ…आकलन
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संदिप घोरपडे लिखीत दिग्दर्शित अ…आ… आकलन हे बालनाट्य सादर करण्यात आले. आजच्या काळातील शिक्षण व्यवस्थेचे झालेले बाजारीकरण मुलांचे नैसर्गिक बालपण हिरावून घेत या व्यवस्थेतील यांत्रिकता त्यांना काबीज करीत आहे. आईवडीलांच्या अपेक्षा, शाळा, शिक्षक, क्लासचालक व एकूणच स्पर्धात युगातील असलेला दबाब हा मुलांच्या सहनशीलते पलिकडे असून, या तणावाचे योग्य नियोजन होत नसल्याने मुलांना त्याच्या विपरीत परिणामांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवण्याऐवजी रोजगाराला केंद्रस्थानी ठेवल्याने हे गणित फसत आहे. हसत खेळत अभ्यास केल्याने तो लवकर लक्षात राहतो व मुलांचे बालपण हिरावून घेतले जात नाही, असा संदेश देणार्या या बालनाट्यात हर्षदा वारुळे, प्राची पाटील, मानस भवरे, प्रसाद महाजन, रितेश भामरे, आर्यन साळुंखे, कुशल पाटील, मनिष पाटील, हरिष न्हावी, भावेश नेरकर, रेचल नेरकर, प्रेरणा शिंदे, भाविका साळुंखे, कार्तिकी साळुंखे, धारिणी पाटील, नूतन पाटील, हर्षवर्धन पाटील, भूमिका घोरपडे या बालकलावंतांनी अभिनय केला. तांत्रिक बाजू घनःश्याम पाटील (ध्वनी), राहुल निंबाळकर (प्रकाशयोजना), समाधान पाटील, श्रावण महाजन (नेपथ्य), योगेश संदानशिव, नितीन शिरसाठ, योगेश पाटील (पार्श्वसंगीत), हेमंत चौधरी (नृत्य), मनिष उघडे (वेशभूषा) यांनी सांभाळल्या.














