पाचोरा (किशोर रायसाकडा)- पाचोरा न.प.प्रशासन विद्युत कंपनी,सार्वजनिक बांधकाम, बायपास हायवे विभाग यांचा गलथान कारभार न थांबवल्यास व नागरिकांच्या मुलभूत सुविधा तातडीने पूर्ण न केल्यास दि. 25 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजेपासून उपविभागीय अधिकारी,पाचोरा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचे पत्र ध्येय न्यूज चॅनेलचे संपादक संदीप दा. महाजन यांनी दिले आहे.
संदीप महाजन यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पाचोरा शहराबाहेरील बायपास हायवे रोडचे काम संथ गतीने सुरु असल्यामुळे संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेऊन संबंधीत कंपनीने हिवरा नदीवरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतू ते पूर्ण न केल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या मातीचा पूल हा वाहून गेल्यामुळे गेल्या पाच दिवसापासून कृष्णा पुरीसह त्या भागाकडील जाणारी-येणारी दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचारी नागरिकांसह विशेषत: शालेय महाविद्यालयीन विद्याथ्याचा संपर्क खंडीत झाला आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने अत्याधुनिक साधनांचा वापर करुन तातडीने सदरचा पुल उभारुन वरील स्वरुपाची रहदारी कार्यान्वित करावी, पाचारो शहरातील भुयारी पुलातील साफ-सफाई ही शास्त्रोक्त व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित होत नसल्यामुळे तेथे सतत चिखल होवून अपघात होत आहे. तरी भुयारी पुलाच्या अंतर्गत काढण्यात आलेल्या बारिक चार्यातील घाण काढण्यासाठी त्या साईजमधील पावड्या तयार करण्यात याव्या व तेथील मातीयुक्त चिखल नियमित उचलण्यासाठी दिवसांतून दोन वेळा कर्मचारी नियुक्त करण्यात यावे व तेथील जी घाण आहे ती संबंधित कर्मचारी भुयारी पुलाच्या जिन्याखाली लावतात. पर्यायाने पाणी साचल्यानंतर पुन:श्च ती घाण भुयारी पुलात जैसे थे होते. म्हणून नाईलाजास्तव सफाई कर्मचार्यांच्या निषेधार्थ या जिन्याखाली सिमेंटचा 5-6 फुट एवढी भिंत बांधण्यात येवून व त्याठिकाणी कचराकुंडी करण्यात यावी. तसेच पादचार्यांसाठी जो जीना करण्यात आला आहे त्याच्या पारर्या तुटल्या असून त्याचे नुतनीकरण करण्यात यावे, पाचोरा शहरात व कॉलनी परिसरात चोर्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शहरात शोपीस ठरलेल्या सर्वच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरु करण्यात यावे, पाचोरा शहराने पाणीटंचाई काळात 8 दिवसापासून ते तब्दल दीड महिन्यापावेतो पाणीटंचाईची झळ सोसली आहे. परंतू सद्यस्थितीत नदी-नाले-धरणे-केटीवेअर पाण्याने ओसांडून वाहत असतांना आतासुध्दा शहरात 8 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तरी सदरचा पाणीपुरवठा दररोज करण्यात यावा आणि तो देखील फिल्टरेशन प्लॅन्टमधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा, पाचोरा शहरातील गो.से.हायस्कूल रोड, गणेश कॉलनी, थेपडे नगर परिसरासह पुनगाव रोडवरील सार्वजनिक पथदिवे बंद पडणे नित्याचे झाले आहे. सद्यस्थितीत देखील सुमारे 3 दिवसांपासून हे पथदिवे बंद आहेत तरी पाचोरा नगरपालिका व विद्युत मंडळ यांचा समन्वय घडून सार्वजनिक पथदिवे नियमित चालू करण्यात यावे, पाचोरा शहरात विशेषत: गो.से. हायस्कूल रोड,गणेश कॉलनी, थेडे नगर परिसरसह पुनगांव रोडवरील झाडांची कटाई विद्युत मंडळाच्या कर्मचार्यांनी केली आहे व सद्यस्थितीत या झाडांची कटाई केलेल्या फांद्या तशाच पडून दुर्गंधीयुक्त वातावरण होवून रोगराई वाढली आहे. यासाठी पाचोरा न.पा. परवानगी न घेता झाडे कटाई करणार्या संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी व तोडण्यात आलेल्या झाडांच्या फांद्या उचलण्याची तातडीने कारवाई करावी, पाचोरा शहरात गो.से. हायस्कूल रोड, गणेश कॉलनी थेपडे नगर परिसरसह पुनगांव रोड परिसरात रस्त्यांची दुर्दशा अत्यंत बिकट झालेली आहे. विद्यार्थ्यांना व नागरिकांना चालणे देखील शक्य नाही. तात्पुरता स्वरुपात काही ठिकाणी मुरुम टाकण्यात येतो परंतू याचा काही उपयोग होत नाही. म्हणून सदरचा रस्ता रहजदारी योग्य म्हणजेच (आदित्य ठाकरे पाचोरा शहरात ज्या रस्त्यावरुन येणार होते त्या रस्त्यावरील खड्डे तसे तात्पुरता स्वरुपात खडी-कच टाकून तयार करण्यात आला होता) तसा लाखो रुपये कर भरणार्या नागरिकांसाठी करण्यात यावा, पाचोरा शहरात गो.से. हायस्कूल रोड, गणेश कॉलनी, थेपडे नगर परिसरासह पुनगाव रोड परिसरात दोघं साईडला ज्या गटारी वजा नाले आहेत त्यांची सफाई छोट्या जोसीबीद्वारे होवून त्या ठिकाणी काढण्यात आलेली ओली-सुकी घाण दोन दिवसात उचलण्यात यावी, पाचोरा शहरात गो.से. हायस्कूल रोड, गणेश कॉलनी, थेपडे नगर परिसरसह पुनगांव रोड परिसरात डास-मच्छर-किडे यांनी थैमान घातले असून त्याठिकाणी अत्याधुनिक केमिकल्सचा वापर करुन फवारणी करण्यात यावी. या नऊ स्वरुपाच्या मागण्या असून या फक्त एका परिसरात नाही तर संपूर्ण पाचोरा शहरात आहे. मात्र पाचोरा शहरातील जनता ही सहनशिलता करणारी असल्याने त्याची जाणीव संबंधीत प्रशासनाला चांगल्याप्रकारे माहित असल्यामुळे या मुलभूत सुविधेकडे लक्ष देत नाही. वेळोवेळी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाने देखील या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले. परंतू त्याची दखल देखील संबंधित प्रशासन घ्यावयास तयार नाही. म्हणून नाईलाजास्तव मला उपोषणाच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. आपल्या स्तरावरुन योग्य ती कारवाई व्हावी अशी विनंती संदीप दा. महाजन यांनी उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्याकडे केली.