नवी दिल्ली- तुमच्या याचिकेवर सुनावणी करू. मात्र, त्याआधी हिंसाचार थांबवण्यात यावा असे स्पष्ट शब्दात आज सुप्रीम कोर्टाने आंदोलक विद्यार्थ्यांना समज दिली. जामिया मिलिया विद्यापीठ आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी ज्येष्ठ वकील अॅड. इंदिरा जयसिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली.
सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. देशभरात मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले. पोलिसांकडून हिंसाचार करण्यात आला. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी यावेळी मांडला. आम्ही शांततेत होणाऱ्या आंदोलनाच्या विरोधात नाही आणि नागरिकांना असणाऱ्या अधिकारांचे संरक्षण ही आमची जबाबदारी असल्याचे सुप्रीम कोर्टाने यावेळी स्पष्ट केले.















