जळगाव प्रतिनिधी : उद्या बुधवारपासून नशिराबाद टोलनाक्यावरून टोलवसुलीला सुरुवात होणार आहे. या बाबत कुठल्या वाहनासाठी किती दर आकारले जाईल, याबाबतचे नुकतेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दरांबद्दलची सार्वजनिक सूचना जारी केली आहे. त्यामुळे आता बुधवारपासून महामार्गाच्या वापरासाठी आता वाहनधारकांना पैसे मोजावे लागणार आहे.
जाणून घ्या कोणत्या वाहनासाठी किती असणार दर?
कार, प्रवासी व्हॅन, जीप, हलके मोटार वाहनाच्या एकेरी प्रवासाठी ८५ तर एका दिवसात परतीचा प्रवासाकरिता १३० रुपये आकारले जाणार आहे. त्याशिवाय हलके वाणिज्य वाहन, हलके मालवाहू वाहनाच्या एकेरी प्रवासासाठी १४० रुपये तर परतीच्या प्रवासाकरिता २१० रुपये़, ट्रक व बस एकेरी प्रवासाठी २९५ तर परतीच्या प्रवासाकरिता ४४०़, खोदकाम करणारी, माती वाहून नेणारे उपकरणे, जड बांधकाम यंत्रांच्या एकेरी प्रवासाठी ४६० व एका दिवसाच्या परतीचा प्रवासाकरिता ६९० रुपये आकारले जाणार आहे तर अवजड वाहनांना एकेरी प्रवासाठी ५६० रुपये मोजावे लागणार आहे.
सूटही केली जाहीर
सर्व वाहनांसाठी टोल तिकीट घेतल्यापासून २४ तासांसाठीचा परतीच्या प्रवासाठी २५ टक्के सूट देण्यात आली़ त्याचबरोबर सर्वप्रकारच्या वाहनासांठी टोलशुल्क भरल्याच्या तारखेपासून एका महिन्याकरिता ५० किंवा जास्त एकेरी प्रवास असल्यास त्यात ३३ टक्के सूट मिळणार आहे. टोलनाक्याच्या २० कि.मी. हद्दीतील अवाणिज्य वाहनांसाठी कॅलेंडर महिन्यासाठी स्थानिक पास हा २८५ रुपयांचा असेल.















