मुंबई : वडापाव घेण्यासाठी दुकानावर गेलेल्या सात वर्षीय मुलीला गोडगोड बोलून तिला दुकानापासून तब्बल एक ते दीड किलोमीटर दाट झाडी असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर नराधमाने तिथून पळ काढला.
याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सचिन अनंत शामा असे 35 वर्षीय आरोपीचे नाव आहे.
काय आहे नेमका प्रकार?
घाटकोपरच्या आनंद नगर विभागात पीडित सात वर्षीय मुलगी वडापावच्या दुकानात आली होती. यानंतर या आरोपीने तिच्यासोबत गोडगोड बोलायला सुरुवात केली आणि तो घाटकोपरच्या वडापावच्या दुकानापासून तब्बल एक ते दीड किलोमीटर दाट झाडी असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी नराधम मुलीला घेऊन गेला. तिथे त्याने या सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केले. त्यानंतर तिथून पळ काढला.
या घटनेनंतर तिथून जाणाऱ्या नागरिकांनी मुलीला पाहिलं आणि पोलिसांना तसेच तिच्या नातेवाईकांना कळवले. पोलिसांनी लगेचच मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार करून विभागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासलं आहे. यात पोलिसांना आरोपीचा फोटो मिळाला. पोलिसांनी तात्काळ भिवंडी येथे सापळा रचून त्याला 24 तासांच्या आत अटक केली.














